विचार विनिमय सभेतून चौबारीकरांनी केला ग्राम विकासाचा संकल्प
उपक्रम : आगामी पाच वर्षात आदर्श गाव करण्याचा केला निर्धार
रवी मोरे
अमळनेर : विविध योजना, सामाजिक उपक्रम तसेच तरुणांच्या माध्यमातून गावात नवनवीन संकल्पना राबवून आगामी पाच वर्षात गावाची ओळख एक आदर्श गाव म्हणून व्हावी यासाठी तालुक्यातील चौबारी येथे ग्रामदैवत मारुतीच्या मंदिरावर नुकतीच विचार विनिमय सभा पार पडली.
या सभेची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आली. त्यानंतर १९ फेब्रुवारी रोजी गठीत केलेल्या समितीने शिव जन्मोत्सव उत्कृष्ट नियोजनाद्वारे पार पाडल्याने समितीचे अध्यक्ष सागर निकम तसेच सर्व सदस्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी शिव स्मारक उभारण्यासाठीच्या जागेसंदर्भातही चर्चा करण्यात आली. तसेच आगामी शिव स्मारकाची देखरेख, जागा मंजुरी, स्मारकासाठी परवानगी, निधी संकलन आदी कामांसाठी एक समिती गठीत करण्यात आली. गावाच्या सर्वांगिण विकासासाठी ‘नको राजकारण, गावाला हवं समाजकारण’ हा उद्देश समोर ठेवून ‘चौबारी विकास मंडळ’ स्थापन करुन शंभरच्यावर सभासद नोंदणी करुन सर्व ग्रामस्थांच्या सहभागातून गावाच्या विकासाचे नियोजन करण्यात आले.
ग्राम स्वच्छता, सुशोभिकरण, वृक्ष लागवड, जल संधारण, शेती विकास या विषयावर चर्चा होवून याबाबतची समितीदेखील गठीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.
विवाह पध्दतीत बदल होऊन आहेर(साडी)पद्धत बंद व्हावी, गावातील सर्व तरुणांचा विवाह संबंधी बायोडाटा जमा करुन विवाह जुळणीसाठी सर्व ग्रामस्थांनी प्रयत्न करावा, तसेच लग्न पत्रिका प्रत्यक्ष वाटप न करता अपघात टाळण्यासाठी मोबाइलच्या माध्यमातून पत्रिका पाठविण्यात याव्यात, असाही निर्णय घेण्यात आला.
यावेळी गावात पन्नास स्वयंसेवकांची निवड करुन त्यांचा उपयोग समाजहितांच्या कामासाठी करायचा निर्णयही घेण्यात आला. गावात यात्रोत्सवाचे आयोजन करुन गावातील जेष्ठ- कनिष्ठ, सेवानिवृत, डॉक्टर्स, इंजिनिअर्स, शिक्षणक्षेत्र, शासकिय सेवेतील, आजी-माजी सरपंच, पोलिस पाटील, आधीपासुन सालदारकी करणारे, मुकरदम यांचा नागरी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्याचाही निर्णय घेण्यात आला. ज्ञानवर्धिनी फाउंडेशनतर्फे तरुणांना प्रशिक्षण व रोजगार कसा उपलब्ध होईल यावर सकारात्मक चर्चा होवुन तरुणांना यात सहभागी होण्यासाठी आवाहन करण्यात आले.
यावेळी मधुकर भास्कर पाटील, धुळे माध्यमिक शिक्षक मच्छिंद्र साहेबराव पाटील (चौबारीकर) अॅड. नितीन पाटील (धुळे), शिवसेना तालुकाप्रमुख विजय काशिनाथ पाटील, संजय त्र्यंबक पाटील, विठ्ठल कौतिक पाटील, यशवंत वेडु कढरे, प्रशांत गंजिधर पाटील, दुर्योधन हिलाल पाटील, लिलाधर निंबा पाटील, सागर निकम, रवींद्र मोरे तसेच शिव जन्मोत्सव समितीचे सर्व सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.






