महामहिम राष्ट्रपती,पंतप्रधान,केंद्रीय आदिवासी मंत्र्यांना बिरसा क्रांती दल अकोला जिल्हा वतीने जिल्हाधिकारी मार्फत निवेदन
तो शब्द धनगड नाही, धांगड आहेत
आदिवासी सूचित धनगराचा समावेश करु नका.
अकोला / प्रतिनिधी – संतोष ठाकरे
अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर समाजाचा समावेश करण्याची मागणी नुकतीच लोकसभे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खा.सुप्रिया सुळे यांनी केली आहे .
या असंवैधानिक मागणीला बिरसा क्रांती दलाने जोरदार विरोध करीत महामहिम राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय आदिवासी मंत्री यांना जिल्हाधिकारी यांचे मार्फत निवेदन पाठवून धनगर समाजाला आदिवासींच्या यादीत समाविष्ट करण्यात येवू नये अशी मागणी केली आहे.
धनगर ,धनगड हे दोन्हीही शब्द अनुसूचित जमातीच्या सुचित नाहीत. धनगड ही जमातच नाही. असा दावा बिरसा क्रांती दलाने केला आहे.
तरीही काही गैर आदिवासी लोकप्रतिनिधीकडून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सुचित घुसविण्यासाठी असंवैधानिक मागणीचा पाठपुरावा करतांना दिसत आहे. याबाबत जाहीर निषेध नोंदवून खंत व्यक्त केली आहे.
निवेदनात नमूद केले की,
महाराष्ट्राच्या सुचित Dhangad या शब्दाचे भाषांतर धनगड असे केल्या जात आहे.त्याचे भाषांतर धांगड असे हवे आहे.महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जमातीच्या यादीत क्रमांक ३६ वर ओराँन जमात आहे.तीची पोटजमात धांगड आहे.ओराँन ही भारतातील प्रमुख जमात आहे.तीला बिहार, मध्य प्रदेश , महाराष्ट्र, ओरीसा,पश्चिम बंगाल, छत्तीसगड, झारखंड या ७ राज्याच्या सुचित दर्शविले आहे.महाराष्ट्रात ओराँन, धांगड नाहीत. पण सुचित आहे.
ओराँनच्या शेतात ,घरी रोजंदार म्हणून काम करणारी धांगड ही जमात होय.या दोन्ही जमातीचे खानपान ,रितीरिवाज, प्रथा,परंपरा, विधीसंस्कार सारखेच आहेत.ओराँन ,धांगड जमातीचे लोक धर्मीज नावाच्या महादेवाची पुजा करतात. अन्नाकौरी किंवा महाधारी देवता यांच्यात आहे.त्यांचा मुख्य सण सरहुल आहे.ओराँन, धांगड लोक उरीया किंवा हिंदी भाषा बोलतात. धनगर जातीचा या जमातीशी तीळमात्र संबंध नाही.
महाराष्ट्र शासनाने सन १९७९ ला धनगराचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला होता.यावर संबंधित विभागात सखोल चर्चा ही झाली पण धनगर समाज आदिवासींचे निकष पुर्ण करु शकत नसल्याने हा प्रस्ताव केंद्र सरकारने नाकारला आणि अखेर महाराष्ट्र शासनाने १९८१ मध्ये आपला प्रस्ताव मागे घेतला.
१२ जुलै २००५ रोजी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेच्या सभापतीने खास बैठक घेऊन धनगरांच्या प्रश्नावर चर्चा केली, धनगर जातीचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करण्यात येते का ? याकरीता संशोधन पथक तयार करून २००६ साली एप्रिल महिन्यात बिहार, ओरीसा व झारखंड राज्यात पाठविण्यात आले.धनगर जातीला या राज्यात समाविष्ट केले आहेत काय ? याचा शोध घेणे.या संशोधन पथकाने १ जून २००६ रोजी अहवाल सादर केला. पथकाने असे लिहिले आहे की, ओराँन जमातीतील जे लोक
दुसऱ्याच्या शेतावर अथवा घरात मजूर म्हणून काम करतात त्यांना धांगड असे म्हणतात. त्यामुळे बिहार, ओरीसा, झारखंड या राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीत या शब्दाचा समावेश करण्यात आला आहे. तथापि धांगड या शब्दाचे इंग्रजी मध्ये Dhangad असे स्पेलींग होते. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या यादीत Dhangad धांगड ही ओराँनची तत्सम जमात म्हणून नमूद केले आहे. या दोन्ही जमाती आणि धनगर भिन्न आहे.धनगर ही जात आहे जमात नाही.
१९११ ची जनगणना तक्ता क्रमांक ६ केवळ जातीचा आहे.त्यामध्ये क्रमांक ७ वर धनगर व त्याची जात भारवाड, कुरुळा अशी नोंद आहे. १९११ मध्ये बाँम्बे प्रेसीडेंन्सी ,सी.पी.अँड बेरार ,मराठवाडा या तीन प्रातांत धनगर जात म्हणून उल्लेख आहे.जमात म्हणून नाही. या तक्त्यात २८ जाती आहेत .
आँल इंडिया धनगर समाज महासंघाने अलाहाबाद कोर्टात १७/७/२००९ रोजी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने दि.१४/३/२०१४ रोजी निर्णय दिला की धनगर ही जात आहे,जमात नाही. त्यामुळे ती अनुसूचित जातीच्या (sc ) प्रवर्गात येत असून त्यांना जातीचे प्रमाणपत्र द्यावे.
धनगर आदिवासी नाहीत ऐतिहासिक पुरावे
१) मागील ३०० वर्षाचा इतिहास चाळला तर लक्षात येईल की,आदिवासी आणि धनगर हे दोन भिन्न समाज आहे.इतिहासकारांनी मल्हारराव होळकर व अहिल्याबाई होळकर यांच्या संघर्ष व लढाईला कुठेही आदिवासींचा संघर्ष व लढाई म्हटले नाहीत.
२) यवतमाळ जिल्हा गँझेट १९०८ पान क्र.२०१ वर धनोजे कुणबी व धनगर एकच समाज असल्याचे म्हटले आहे.
३) जातीविवेक या ग्रंथात स्पष्टपणे सांगितले आहे की,धनगर हे शुद्रपिता आणि महिश्या माता ह्यांची संतान आहे पुढे असेही सांगितले की,महिश्या हा क्षत्रिय पुरुष आणि वैश्य माता ह्यांचे अपत्य आहे.
४) डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तिसरे अधिवेशन पंढरपूर येथे भरविले होते .तेव्हा धनगरांनी त्या अधिवेशनाला जाहिरात दिली होती.ती क्षत्रिय धनगर अशी होती.
५) आर.ई.ईन्थाव्हेन यांनी खंड क्र.१ मध्ये धनगर जातीची माहिती दिली आहे. ते म्हणतात दक्षिणेतील धनगर आणि उत्तर भारतातील धांगड हे दोन्ही समाज एक नाहीत. ईन्थाव्हेन धनगराच्या २३ पोटजातीही सांगतात.
६) आर.व्ही.रसेल हे धनगरांना जमात न म्हणतात जात म्हणूनच लिहतात, धनगर ही मेंढपाळ आणि ब्लँकेट विणणा-या लोकांची मराठा जात आहे असे म्हणतात.
७) महात्मा फुले शेतकऱ्यांचा आसूड या ग्रंथात म्हणतात की,जे शुद्ध शेती करतात ते कुणबी, जे बागायती शेती करतात ते माळी,जे शेती- बागायती करुन शेळी – मेंढी पाळतात ते धनगर. मुळात मराठा, कुणबी माळी व धनगर इत्यादी प्राचीन काळी एकच असावे असेही म्हणतात.
८) धनगर मराठ्यांची उपजात – धनगर हा शब्द संस्कृत शब्द धेनुगर यापासून आला आहे.असे अभ्यासक म्हणतात धेनुगर म्हणजे गाई पाळणारा,दुसरीकडे या शब्दाचा अर्थ धनवान, धनदांडगा व भरपूर धनदौलत ,कारण धनगराची एक पोटजात हटकर आहे.ही जात अत्यंत गर्भश्रीमंत असून पुर्वी या जातीचा थाट एखाद्या राजापेक्षा कमी नव्हता. धनगर ही जात शारीरिक वैशिष्ट्ये आणि सामाजिक रितीरिवाजाच्या द्रुष्टीने मराठा-कुणबी समाजाच्या जवळची वाटते.म्हणून इतिहास कारांच्या मते ही जात मराठा जातीचीच उपजात आहे.धनगर समाजाच्या पोटजातीची जी यादी आहे त्यामध्ये अहिराच्या नंतर क्रमांक २ वर असल किंवा मराठा ( maratha ) अशी जात आहे.म्हणून इतिहास संशोधकांनी धनगर हे मराठा, कुणबी जातीची उपजात होय असे म्हटले आहे.
राजर्षी शाहू महाराजांनी ३० डिसेंबर १९३० साली धनगरातील होळकर आणि मराठ्यातील घाटगे या दोन कुटुंबात विवाह संबंध जुळवून आणले तसेच मराठा व धनगर यांचे २५ सामुहिक विवाह केल्याची नोंद सत्याग्रही चा मराठा विशेषांक २००० मध्ये आहे.या विवाह संबंधातून मराठा आणि धनगर सामाजिक प्रतिष्ठा स्तरावर समान आहेत.
धनगर आदिवासींच्या कोणत्याही निकषात बसत नाही. ते आदिवासी नाहीत ,ही मागणीच असंवैधानिक आहे.त्यामुळे भारत सरकारने कोणत्याही प्रकारची धनगराची शिफारस स्विकारु नये आणि त्यांचा अनुसूचित जमातीच्या यादीत समावेश करु नये.
निवेदन देताना जिल्हाअध्यक्ष संतोष ठाकरे,सोपान तोडसाम,अजय भोकरे,सुधाकर पांडे,रामचंद्र लोखंडे, शिवसिंग सोळंके, विलास धोंगडे,देवेंद्र सोनटक्के, विश्वनाथ देवकर,बाबाराव साखरे आदि उपस्थित होते.






