बोगस पदवीव्दारे मिळवली पदोन्नती; सोलापूर जिल्हा परिषदेमधील कर्मचाऱ्यांचा शोध सुरू
पुणे प्रतिनिधी दत्ता पारेकर
: जिल्हा परिषदेत बोगस पदवी धारण करून पदोन्नती मिळविलेल्या कर्मचाºयांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या २१ नोव्हेंबर रोजी झालेल्या सभेत उमेश पाटील यांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. बांधकाम खात्यातील ५५ कर्मचाºयांनी बोगस पदव्या धारण करून पदोन्नती मिळविल्याचा आरोप त्यांनी केल्यामुळे खळबळ उडाली होती.
झेडपीच्या सेवेत असताना कॉलेजमध्ये दररोज उपस्थित राहून या कर्मचाºयांनी पदव्या कशा मिळविल्या अन् त्यांना पदोन्नती कोणत्या आधारावर देण्यात आली याची चौकशी करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली होती. विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी फक्त बांधकाम खातेच काय इतर खात्यातही अशा अनेक भानगडी असल्याचे निदर्शनाला आणले होते. यावर तत्कालीन अध्यक्ष शिवानंद पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
सभेतील चर्चेनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी बांधकाम विभागाकडून अशा कर्मचाºयांबाबत माहिती मागितली आहे. कार्यकारी अभियंता कदम यांनी अशाप्रकारे पदोन्नती झालेल्या कर्मचाºयांच्या कागदपत्रांची मागणी केली आहे. प्राथमिक चौकशीत असे १५ कर्मचारी असल्याचे आढळले आहे.
याबाबत अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी वायचळ यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. सुभाष माने यांनी अनेक शिक्षकांनी कर्णबधिर असल्याचे बोगस प्रमाणपत्र देऊन पदोन्नती मिळविल्याचे निदर्शनाला आणले होते तर वसंतनाना देशमुख यांनी तर आरोग्य खात्यातही मोठ्या भानगडी असल्याचा आरोप केला होता. नुसते बांधकाम नव्हे तर शिक्षण व आरोग्य खात्यातील पदोन्नतीची चौकशी केली जाणार असल्याचे वायचळ यांनी स्पष्ट केले.






