?️ दार उघड बये दार उघड..उपविभागीय कार्यालयाच्या बाहेर जनतेची आर्त हाक…
प्रा जयश्री दाभाडे
अमळनेर येथील उपविभागीय कार्यालयात नागरिकांना प्रवेश घेणे कठीण झाले आहे.उपविभागीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आता बंद दरवाजे लावण्यात आले आहेत. कोणताही सामान्य माणूस आत प्रवेश करू शकत नाही. हा दरवाजा कायम बंद राहतो.विशेष म्हणजे आतून बंद केला जातो. बाहेर जनता ताटकळत उभी असते.
सध्या कोरोना पार्श्वभूमीवर शहरात लॉक डाऊन सुरू आहे. लोकांच्या अनेक समस्या परवानगी लहान मोठे विषय असतात की जे उपविभागीय अधिकारी यांच्या शी संलग्न असतात.सध्या लॉक डाऊन च्या परिस्थितीत उपविभागीय अधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन काळात तालुक्याच्या जनतेला बांधील आहेत.विशेष म्हणजे ते आपत्ती व्यवस्थापन काळात संपुर्ण तालुक्याचे सर्वेसर्वां अधिकार त्यांना देण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापन काळात उपविभागीय अधिकारी हे मुख्य जबाबदार अधिकारी असून त्यांच्या वर तालुक्याच्या कायदा आणि सुव्यवस्थे बरोबरच जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी जबाबदार अधिकारी म्हणून बांधील आहेत.
परंतु अमळनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयात ऐन आपत्ती व्यवस्थापन काळात दरवाजे सामान्य जनतेसाठी बंद करण्यात आले आहेत.लोक बाहेर तासनतास वाट पाहतात तरी त्यांना प्रवेश मिळत नाही. बाहेरून दरवाजा ठोकतात पण बराच वेळ दरवाजा उघडला जात नाही. ठराविक च लोकांना आत प्रवेश दिला जात आहे. अश्या परिस्थितीत जनतेने काय करावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबतीत जनते मध्ये संतापाची लाट उसळली असून आज पर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याच्या काळात असा प्रकार घडलेला नाही.
सामान्य जनता आधीच कोरोना च्या संकटामुळे हवालदिल झाली आहे त्यात अधिकारी बंद दरवाजा मागे लपले आहेत.आता सामान्य माणसने आपले प्रश्न कोणाकडे मांडावेत असा प्रश्न निर्माण झाला आहे. अधिकाऱ्यांना एव्हढीच जर भीती वाटत असेल तर त्यांनी रजा घेऊन सुट्टी वर निघून जावे सामान्य माणसाला त्रास देऊ नये अशी चर्चा होत आहे. आधीच अधिकारी आणि सामान्य जनतेत कधी नव्हे तर खूप मोठे अंतर पडले आहे. आज पर्यंत अमळनेर शहरात आलेले सर्व अधिकारी अत्यन्त सोशल ,मनमिळाऊ,लोकांच्या कामाला तालुक्याच्या विकासाला वाहून घेणारे होते.अमळनेर शहरात पहिल्यांदाच सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, राजकीय नेते सामान्य जनता आणि प्रशासन यांच्यात मोठी दरी दुरावा निर्माण झाला आहे. प्रशासनाने अत्यन्त वाईट परिस्थितीत देखील आपला आडमुठे धोरण न सोडता मन मर्जी कारभार सुरू ठेवला आहे. त्याचे परिणाम तालुक्यातील जनतेला भोगावे लागले आहेत. आता आणखी आपल्या नियोजन शून्य धोरणे, तुघलकी नियम,आणि मन मर्जी कारभाराचा फटका सहन करण्याची क्षमता लोकांमध्ये नाही.
अधिकारी हे जनतेच्या सेवे साठी आहेत.त्यांचे काम करण्याचा मेहताना त्यांना रीतसर मिळत असतो.त्यामुळे ते जे काही काम करत आहेत किंवा करतात त्यात जनतेवर उपकार करत नाही तर कर्तव्य बजावत असतात त्यामुळे स्वतःचा अहंकार आणि खुर्ची ची हवा बाजूला ठेवून काम केलं तर जनतेला योग्य तो न्याय मिळेल अश्या भावना लोकांनी व्यक्त केल्या आहेत.
सध्या तरी जनतेच्या तोंडातून उपविभागीय कार्यालायाच्या बाहेर तासनतास उभे राहून दार उघड बये दार उघड असेच शब्द बाहेर पडत आहेत.






