Indapur

इंदापूरात शिक्षण विभागाने राबवली “स्टडी फ्रोम होम” संकल्पना.

इंदापूरात शिक्षण विभागाने राबवली “स्टडी फ्रोम होम” संकल्पना.

पुणे जिल्ह्यात एकमेव संकल्पना राबवणारी इंदापूर पंचायत समिती.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे:कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहुन राज्य सरकारने 14 मार्च पासून राज्यातील सर्व शाळांना 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहीर केली होती.मात्र सध्या लाॅकडाऊन मध्ये 3 मे पर्यंत वाढ करण्यात आल्याने पुढील आदेशाशिवाय या शाळा चालू होणार नाहीत. अचानक ओढावलेली परिस्थिती आणि शासनाने घेतलेला निर्णय यामुळे विद्यार्थ्यांच्या वार्षिक परिक्षा न घेता थेट 1ली ते 10 वी आणि 11 वी यातील सर्व विद्यार्थ्यांना प्रचलित निकषानुसार बढती देण्याचा निर्णय राज्यसरकारने केला आहे. मात्र या सुट्टीच्या कालावधीत इंदापूर पंचायत समिती शिक्षण विभागाने सामूहिक रित्या जिल्हा परिषद शाळांमधील 1 ते 7 वी च्या विद्यार्थ्यांसाठी “स्टडी फ्रोम होम” हा अनोखा उपक्रम राबवला असून थंडावलेल्या विद्यार्थ्यांच्या बुध्दीला घरबसल्या चालना दिलीय.

अचानक सरकाने आदेश काढल्याने सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडला. जरी या सर्व विद्यार्थ्यांना बढती मिळाली असली तरी त्यांच्या बुध्दीचा परिपूर्ण विकास होणे गरजेचे आहे. याचा सारासार विचार करुन इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विजयकुमार परीट व गट शिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी वेगळी शक्कल लढवली. “घरी बसून अभ्यास करूया,कोरोना ची लढाई जिंकूया” या संकल्पनेतून बेवसाईटच्या माध्यमातून काही शिक्षकांच्या मदतीतून विद्यार्थ्यांकडून घरबसल्या मोबाईल वरच इंटरनेटच्या माध्यमातून ही अनोखी शिक्षण पद्धती राबवलीय.

दिनांक 10 एप्रिल ते 13 एप्रिल दरम्यान ही प्रकिया पार पडली असून या पहिल्याच टप्प्यात तालुक्यातील 378 जिल्हा परिषद शाळांमधील 1 ली ते 7 वी च्या 19743 एकूण विद्यार्थ्यांपैकी अंदाजे 14 हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला. कोरोनाच्या लाॅकडाऊन काळात पुणे जिल्ह्यातील इंदापूर पंचायत समिती ही अशी शिक्षणपध्दती राबवणारी पहिली पंचायत समिती ठरली असल्याचे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी सांगितले.

यात मराठी गणित व इंग्रजी या प्रमुख विषयाची 30 प्रश्नांची आॅनलाईन टेस्ट घेण्यात आली असून प्रत्येक विषयाचे 10 प्रश्न असे एकूण ३० प्रश्न एका इयत्तेसाठी समाविष्ट करण्यात आले होते. एका प्रश्नाला एक मार्क देण्यात आला होता. शिवाय वर्ष 2019/20 या अभ्यासक्रमातील प्रश्न यात समाविष्ट होते. तर यासाठी वेळेचे कोणतेही बंधन नव्हते. ठरवुन दिलेल्या तीन दिवसाच्या कालावधीत तो विद्यार्थी कधीही आपली टेस्ट सोडवु शकतो.दिनांक 15 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान दुसरा टप्पा सुरु होत असून 30 एप्रिल पर्यंत असे टप्पे तीन टप्पे राबवण्यात येणार आहेत. यासाठी अकरा तंत्रस्नेही शिक्षकांचा विशेष ग्रुप करण्यात आला असून हे शिक्षक प्रश्नपत्रिका स्वरयंत्र तयार करुन विद्यार्थ्यां पर्यंत ही संकल्पना पोहचवत त्यातील अडाडचणी दुर करत ही संकल्पना पार पाडतात. असे गट शिक्षणाधिकारी राजकुमार बामणे यांनी सांगितले.

सध्या सर्व शाळांना सुट्टया असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडला आहे. मात्र पुणे जिल्ह्यात इंदापूर पंचायत समितीने याला वेगळी दिशा देत जिल्ह्यात अनोखा उपक्रम राबवत शाळा बंद राहिल्याने विद्यार्थ्यांचे जे संभाव्य नुकसान होणार होते ते टाळण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमाचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांसह पंचायत समिती सभापती पुष्पा रेडके यांनी कौतुक केले आहे. तर जिल्ह्यातील इतर शाळांनी हा उपक्रमाचा आदर्श घेतल्यास विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान नक्कीच टाळता येऊ शकते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button