‘फक्त काही तास बाकी’; नितेश राणेंच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ
कोल्हापुर प्रतिनिधि अनिल पाटील :
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी भाजपच्या प्रवेशासाठी अखेरचे प्रयत्न सुरूच ठेवले आहेत. या प्रयत्नाचाच भाग म्हणून त्यांचे पुत्र नितेश राणे यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याचे बोलले जात आहे. नितेश राणे यांना भाजपमध्ये प्रवेश न करताच एबी फॉर्म देण्यात येणार असल्याचीही चर्चा सुरु आहे. याच दरम्यान, नितेश राणे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘फक्त काही तास बाकी, वादळापूर्वीची शांतता,’ असे त्यांनी ट्विट केले आहे.
कोकणात भाजपची ताकद नसल्यामुळे विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या विरोधात वापर करण्यासाठी राणे यांना भाजपत प्रवेश दिला जाईल, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली होती. शिवसेनेसोबत युती न झाल्यास त्यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात होता. पण या निवडणुकीतही युती कायम राहिली. युतीच्या जागावाटपानंतर राणेंना भाजपात घेण्यास शिवसेनेचा विरोध मावळेल, असे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर राणे यांचे पुत्र नितेश यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे.
नितेश राणे यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांचे खासगी सचिव राजकुमार सागर यांच्याकडे दिलेला राजीनामा बागडे यांनी स्वीकारला आहे.
_______________________________






