पंढरपुरातून रोडरोमियो होताहेत हद्दपार– पोलीस उपाधीक्षक डॉ. सागर कवडे
पंढरपूर- प्रतिनिधी रफिक अतार
‘सध्या वाढत्या प्रमाणात असलेल्या सोशल मीडियाचा वापर मुलींनी योग्य पद्धतीने करावेत, तसेच मुलींनी कोणत्याही रोडरोमियोंकडून कोणत्याही प्रकारे त्रास होत असेल अथवा भीती दाखवून तो ब्लॅक मेल करत असेल तर निर्भया पथकाकडे रीतसर तक्रार द्या. दिलेल्या तक्रारीची खातरजमा करून संबंधित व्यक्तीवर तात्काळ कारवाई केली जाईल. यातून आपले नाव देखील गुप्त राहील. यामुळे निष्कारण त्रास देणाऱ्या रोडरोमियोंचा वेळीच बंदोबस्त करू. ही कारवाई नियमित सुरु असून आता रोडरोमियोंनी याचा चांगलाच धसका घेतला असून आता रोडरोमियों नावाची कीड हद्दपार होत आहे.’असे प्रतिपादन पंढरपूर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. सागर कवडे यांनी केले.
स्वेरीमध्ये ‘अवेरनेस कॅम्प ऑफ व्हेरियस अॅक्ट फॉर वुमन हरेसमेंट’ या विषयावर स्वेरीज् कॉलेज ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये आयोजिलेल्या व्याख्यानात पंढरपूर विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.सागर कवडे मार्गदर्शन करत होते. प्रारंभी निर्भया पथकाचे प्रमुख पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र गाडेकर म्हणाले की, ‘कोल्हापूर परिक्षेत्राचे तत्कालीन पोलीस महासंचालक डॉ.विश्वास नांगरे-पाटील यांच्या संकल्पनेतून महाविद्यालयीन विद्यार्थीनींची सुरक्षितता लक्षात घेवून त्यांच्या संरक्षणात आणखी वाढ केली आहे. निर्भया पथकाद्वारे आता रोडरोमियोंच्या विरोधात ठोस पावले उचलली जात आहेत. त्यामुळे विद्यार्थीनीच्या व महिलांच्या रक्षणाच्या दृष्टीने या निर्भय पथकाची स्थापना झाली असून रोडरोमियोंवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले आहे. महाविद्यालय, सार्वजनिक ठिकाण, बाग-बगीच्या, बाजारपेठ, वर्दळीचे ठिकाण आदी संबंधित ठिकाणी साध्या पोशाखात निर्भयातील पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. कायदा हा महिलांच्या बाजूने असून आपण कोणत्याही गावगुंडाची भीती बाळगू नका. आपल्यावर होत असलेल्या त्रासाबाबत आपण दिलेल्या तक्रारीची शहानिशा करून संबंधित टवाळखोर, रोडरोमियो यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे. यातूनही मुलीला, विद्यार्थिनींना किंवा महिलांना रोडरोमियोंकडून त्रास होत असेल तर १०९३ या टोल फ्री क्रमांकावर याची कल्पना द्यावी. पोलीस स्टेशनला दिलेल्या निनावी अर्जावर देखील त्या संबंधित घटनेची खात्री करून संशयित आरोपीवर कारवाई होत असते. त्यामुळे महिलांनी व विद्यार्थिनींनी रोडरोमिओच्या विरोधात पावले उचलण्याची गरज असल्याचेही सांगितले. महिला पोलीस संगीता कुटे म्हणाल्या की, ‘स्त्रियांना समाजात निर्भयपणे वावरण्यासाठी निर्भया पथकाची स्थापना केली असून वाढत्या विकृती जागीच थोपविण्यासाठी महिलांनी पुढे यावे. महीला पोलीस कॉन्स्टेबल कुसुम शिरसागर म्हणाल्या, ‘मुलींनी कोणताही अन्याय-अत्याचार सहन करू नये, जर त्रास होत असेल तर त्वरित मोबा.क्रमांक ८९९९९३८०८० यावर संपर्क साधल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल.’ असे आवाहन देखील निर्भया पथकाच्या वतीने केले. आपल्या स्मार्ट फोनमध्ये ‘प्रतिसाद’ ॲप डाऊनलोड करून त्यात योग्य माहिती भरल्यास तात्काळ मदत मिळू शकते.’ असे सांगितले. पो.उ.अधीक्षक डॉ. कवडे यांनी अशा प्रकारच्या गुन्ह्याचे विविध प्रकार व त्यावर करण्यात येणारी कारवाई याबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी पो.कॉ.आदिनाथ रोडगे, विनोद शिंदे, चंदा निमगरे, डिप्लोमा इंजिनिअरींग चे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांच्यासह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. प्रा. सुनिल भिंगारे यांनी सुत्रसंचालन केले तर स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम एम पवार यांनी स्वेरीमध्ये संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली लैंगिक अत्याचार संबंधी उचलण्यात येणारी कठोर पावले आणि यावर नियोजिलेल्या समितीची ठोस भूमिका याची सविस्तर माहिती देवून उपस्थितांचे आभार मानले.
.‘अवेरनेस कॅम्प ऑफ व्हेरियस अॅक्ट फॉर वुमन हरेसमेंट’या विषयावर स्वेरीज् कॉलेज ऑफ डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये आयोजिलेल्या व्याख्यानाचे उदघाटन करताना पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.सागर कवडे सोबत डावीकडून निर्भया पथकाचे प्रमुख पो.उ.नि.राजेंद्र गाडेकर, पो कॉ.आदिनाथ रोडगे, पो.कॉ.विनोद शिंदे, म.पो.कॉ. चंदा निमगरे, कुसुम शिरसागर, संगीता कुटे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम एम पवार, डिप्लोमाचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ व विद्यार्थिनी.
विद्यार्थ्याना मार्गदर्शन करताना पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ.सागर कवडे.







