?दिलाचे Talk..पणत्याच विझल्या की …संवेदना बोथट झाल्या..!
या आठवड्यात ब्राम्हणपूरी, बुरझड, शिरपूर, विसरवाडी येथील मुलींवर क्रुरतापुर्वक अत्याचाराच्या चार घटना घडल्या. या घटनांवर एकही ‘मेणबत्ती’ पेटली नाही. निषेध व्यक्त झाला नाही आणि निवेदनही दिले गेले नाही.
धुळे : शिरपूर येथील 18 वर्षीय तरूणीवर सामूहिक अत्याचार करून तिला शिरपूर-शहादा रस्त्यावरील काटेरी झुडपांमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह लटकविण्यात आला. या 18 वर्षीय तरूणीची विटंबना इथेच थांबली नाही तर झाडावर लटकविलेला मृतदेह पाहून वासनांध दोन विकृतांनी पुन्हा हा मृतदेह खाली उतरवून त्या निष्पाप देहावर अमानवीय अत्याचार केलेत. इतकी ‘जघन्य’ आणि मेंदूला ‘झिणझिण्या’ आणणारी क्रुर घटना धुळे जिल्ह्यात घडते. परंतू समाज माध्यमातील हजारो तरूणांना या घटनेचा ‘संताप’ आला नाही, राग आला नाही. या घटनेचा साधा निषेध करावा असे एखाद्या राजकीय पक्षाला देखील वाटले नाही. अत्याचाराची इतकी ‘घृणित’ घटना या जिल्ह्यात घडते आणि त्यावर एकही मेणबत्ती पेटत नाही. पणत्याही विझल्या की संवेदनाच ‘बोथट’ झाल्या असा प्रश्न आमच्या मनाला पडला आहे. शिरपूर येथून 8 जून रोजी 18 वर्षीय तरूणी आमली पावरा बेपत्ता झाली. गळफास घेतलेल्या अवस्थेत तिचा मृतदेह सापडला आणि पोलीस तपासात या तरूणीवर अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाले. अत्याचार करून सदर तरूणीला मारून टाकले आणि तिने आत्महत्या केली असा बनाव करून तिला काटेरी झुडपात झाडाला लटकविण्यात आले. आणि थोड्याच वेळाने या ठिकाणाहून जाणार्या दोन विकृत तरूणांना हा मृतदेह दिसला. आणि वासनांध विकृतांनी त्या मृतदेहाला खाली उतरवपून पुन्हा त्यावर अत्याचार केले ही अत्यंत ‘लाजीरवानी’ आणि मानवतेला ‘काळिमा’ फासणारी घटना या जिल्ह्यात घडली. जीवंतपणी अत्याचार करून जीव घेणार्या आणि मृतदेहावर अत्याचार करणार्या ‘लिंगपिसाट’ हैवानांना अटक करण्यात आली आहे. इथपर्यंत ठीक आहे, परंतू या घटनेवर समाजातून संताप व्यक्त होवू नये, याचे आश्चर्य वाटते. हेमंत पाटील यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षकाने आपल्या मानवी सेवा भावनेतून या प्रकरणाचा छडा लावला. म्हणून आम्ही त्यांचे कौतूक करतो. अर्थात या घटनेचे सुध्दा ‘एन्काऊंटरच’ झाले पाहिजे अशी संतप्त मनाची भावना आहे. परंतू कायद्याच्या चौकटीत तरी या तरूणीला 100 दिवसांत ‘न्याय’ मिळेल का ? असा प्रश्न उपस्थित होतो. तो मिळणार नाही कारण आमच्या कायद्याची ‘द्रविडी’ प्रक्रिया कसाबलासुध्दा पाहुणचार करत होती. परंतू अशा जघन्य, अमानवी, विकृत घटनेवर तरूणांच्या संघटना, महिलांचा आक्रोश, राजकीय संघटना ‘शांत’ कशा ? अशीच घटना मागील वर्षी घडली होती. धुळे तालुक्यातील बुरझड शिवारातील विहिरीत अक्काबाई ठेलारी या 18 वर्षीय तरूणीचा मृतदेह सापडला होता. याबाबत सोनगीर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. परंतू तब्बल 11 महिन्यांनंतर विठोबा कोळसे-ठेलारी या तरूणीच्या वडिलांनी पोलिसात चार नराधमांविरोधात अत्याचार व खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. सामूहिक अत्याचार करून तिचा खून करण्यात आला असल्याचा आरोप मयत अक्काबाई हिच्या वडिलांनी केला आहे. परंतू या प्रकरणात तपास करण्याचा त्रास पोलिसांनी घेतला नाही किंवा त्यांना अशा गुन्ह्यामध्ये ‘रस’ नसावा, असे वाटते. एकेकाळी अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये घटना घडल्यानंतर अनेक महिने गोपनीय तपास सुरू ठेवण्याची पध्दत होती. अलिकडच्या काळात आर्थिक देवाण-घेवाण असलेल्या गुन्ह्यांमध्येच काही पोलीस अधिकारी दखल घेतात. अजून एका अन्य घटनेत शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी येथे एका अल्पवयीन मुलीला गर्भवती करण्यात येवून तिचा बेकायदेशीरपणे गर्भपात करण्यात आल्याची घटना घडली आहे. अत्याचार करणारा तरूण हा ‘श्रीमंत’ घरातील असल्याने प्रकरण ‘रफादफा’ करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला गेला. परंतू पोलीस निरीक्षक दिपक बुधवंत या कर्तव्यदक्ष अधिकार्याने सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करून मध्यप्रदेशातील अल्पवयीन तरूणीला आणि सालदारकी करणार्या तिच्या वडिलांनी न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ‘वासनांध’ विकृतांच्या टोळ्या गावा-गावात ‘सावज’ शोधत आहेत आणि मोबाईल संस्कृतीत अजाणतेपणाच्या काळात नको ते बघायला मिळत असल्याने अल्पवयीन मुलींना जाळ्यात फसविण्याचे प्रकार घडत आहेत. नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरात जामन्यापाडा गावात एका सात वर्षीय चिमुकलीवर याच आठवड्यात अत्याचार करण्यात आले. 28 वर्षीय तरूणाने बळजबरीने या कोवळ्या बालिकेवर अत्याचार केलेत. घरात कुणी नाही याचा फायदा घेत आरोपीने घरात घुसून या चिमुरडीवर अतिप्रसंग केला. तर शिरपूर तालुक्यातील खामखेडा गावातील एका पंधरा वर्षीय तरूणीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. या सर्व घटना ‘विकृत’ मनोवृत्ततीतून घडलेल्या आहेत. या प्रकरणांमध्ये ‘वासनांध’ जनावरांनी या तरूणींना ठार मारून टाकले आहे. समाज सुधारकांनी, महिला मंडळांनी, तरूणांनी, राजकीय पदाधिकार्यांनी यावर ‘चिंतन’ करण्याची गरज आहे. या ‘शैतानांना’ लवकरात लवकर कठोर शिक्षा कशी मिळेल यासाठी प्रशासनावरही दबाव आणण्याची आवश्यकता आहे. काही अधिकारी अतिशय चांगल्या पध्दतीने अशा प्रकरणात पिडीत कुटंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न करतात. परंतू काही अधिकारी एफआयआर दाखल करून घेण्याससुध्दा तयार नसतात. हे या समाजाचे आणि लोकशाहीचे दुर्दैव आहे. परंतू या लिंगपिसाटांना वेळीच ठेचले नाही तर अशा घटना वारंवार होत राहतील. अशा लिंगपिसाटांची तर ‘लिंगच’ छाटली पाहिजेत. परंतू कायद्याचे ‘तत्वज्ञान’ शिकविणारे चौका-चौकात गंमत बघत बसलेले आहेत. कदाचित आमच्या संतप्त भावनांचीही टिंगल उडविली जावू शकते. एक मात्र निश्चित की अशा घटनाक्रमांकडे पोलीस प्रशासनाने अतिशय संवेदनशील होवून गुन्हेगाराला ‘फाशीच्या’ शिक्षेपर्यंत पाहेचविण्यासाठी प्रयत्न करावेत. मृतदेहावर सुध्दा अत्याचार करणारी ‘वासनांध’ तरूणांची टोळकी या भूमीवर जीवंत असेल तर त्यांना ‘ठार’ केलेलेच चांगले आणि अशा घटनेनंतर सुध्दा आमच्या संवेदना ‘संतप्त’ होत नसतील तर आम्ही ‘षंड’ असल्याची खात्री होण्यासाठी कोणतीही ‘वैद्यकीय चाचणी’ करण्याची आवश्यकता नाही. एवढेच !






