जिल्ह्यात आज ७५ नवीन कोरोना पॉझिटीव्ह; यावल, चोपड्यात वाढला वाढता क्रम
रजनीकांत पाटील
जळगाव प्रतिनिधी । आज जिल्ह्यात ७५ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले असून यात यावल आणि चोपडा तालुक्यांमध्ये या विषाणूचा संसर्ग मोठ्या गतीने होत असल्याचे दिसून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून कोरोनोच्या रिपोर्टबाबतची माहिती अपडेट केली आहे. यानुसार आज जिल्ह्यात एकूण ७५ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत. यात सर्वाधीक १७ रूग्ण यावल तालुक्यातील तर याच्या खालोखाल १६ रूग्ण चोपडा तालुक्यातील आहेत. याच्या सोबत जळगाव शहर-६; जळगाव ग्रामीण-७; धरणगाव-६; अमळनेर-४; भडगाव-३; एरंडोल, मुक्ताईनगर व जामनेर प्रत्येकी १; रावेर-५; पारोळा-६ भुसावळ- २ अशा रूग्णांचा समावेश आहे.
आजच्या रिपोर्टमधून जिल्ह्यातील यावल आणि चोपडा तालुक्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून आले आहे. यामुळे येथील प्रशासकीय यंत्रणांवरील ताण वाढल्याचे दिसून येत आहे. आज आलेल्या रिपोर्टनंतर जिल्ह्यात आजवरील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या ही १६५३ इतकी झालेली आहे.






