फैजपूर

नागरी सुरक्षितता व मानवी हक्कांचे संवर्धन संविधानामुळेच शक्य – प्रा लेफ्ट. राजेंद्र राजपूत

नागरी सुरक्षितता व मानवी हक्कांचे संवर्धन संविधानामुळेच शक्य – प्रा लेफ्ट. राजेंद्र राजपूत

सलीम पिंजारी

भारतीय संविधान जगातील सर्वात मोठे लिखित आणि लवचिक संविधान असून संविधानामुळे भारताची ख्याती जगभर विख्यात आहे. लोकशाहीची मजबुती संविधानामुळे शक्य असून नागरी हक्कांचे संवर्धन सविधानामुळे शक्य आहे. प्रत्येक भारतीयाने आपल्या संविधानाचा इतिहास, प्रक्रिया, वैशिष्ट्ये आणि महत्त्व समजून घेऊन समाजातील शेवटच्या घटकापर्यंत सोप्या शैलीत संविधान पोहोचवावे असे मत प्राध्यापक लेफ्ट. राजेंद्र राजपूत यांनी व्यक्त केले.
ते तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात राष्ट्रीय सण व उत्सव समितीच्या वतीने संविधान दिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा डॉ पी आर चौधरी हे होते. तर व्यासपीठावर उपप्राचार्य प्रा अनिल सरोदे, उपप्राचार्य प्रा डी बी तायडे, राष्ट्रीय सण व उत्सव समितीचे प्रमुख प्रा आय पी ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती प्रमुख प्रा आय पी ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून व संविधानाच्या सरनामा चे पूजन करून तसेच 26 नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या शूरवीर पोलीस व नागरिकांच्या पवित्र स्मृतीस श्रद्धांजली देण्यात आली. यासोबत तापी परिसर विद्या मंडळाचे कार्यकारी मंडळाचे सदस्य स्वर्गीय पी सी इंगळे यांना श्रद्धांजली देण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा आय पी ठाकूर यांनी भारतीय संविधानाची वैशिष्ट्यपूर्ण संरचना आणि सद्यस्थितीत जागतिक शांतता व भारतीयांच्या नागरिक हक्काच्या रक्षणासाठी संविधानाची आवश्यकता यासंबंधी विवेचन केले. त्यानंतर राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका कु साक्षी पाटील हिने मनोगत व्यक्त केले. तिने सांगितले की, संविधानाची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविणे हे सुशिक्षित तरुण वर्गाचे कर्तव्य आहे.
अध्यक्षीय समारोप करताना डॉक्टर पी आर चौधरी यांनी भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये, मूलभूत अधिकार आणि हक्क, मार्गदर्शन तत्वे यासंबंधी विश्लेषणात्मक विवेचन केले. यासोबत संविधानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आपण सारे कटिबद्ध राहू, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समिती सदस्य प्रा डी एल सूर्यवंशी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तापी परिसर विद्या मंडळ चे अध्यक्ष माननीय आमदार श्री शिरिष दादा चौधरी व सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले. यासोबत नितीन सपकाळे, सिद्धार्थ तायडे, चेतन इंगळे, अमोल राणे यांनी परिश्रम घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button