Jalgaon

निद्रिस्त ज्वालामुखीला शब्दांची ठिणगी लावणारा महाकवी नामदेव ढसाळ!! मृत्यूकार विनोद अहिरे यांच्या लेखणीतून

निद्रिस्त ज्वालामुखीला शब्दांची ठिणगी लावणारा महाकवी नामदेव ढसाळ!! मृत्यूकार विनोद अहिरे यांच्या लेखणीतून

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो अशा शब्दांनी मृत्यूशय्येवर पहुडलेल्या समाजाच्या अंतरंगातिल निद्रिस्त ज्वालामुखीला आपल्या शब्दांच्या ठिणगीने पेट घ्यायला लावणारा विद्रोही महाकवी नामदेव ढसाळ यांचा १५ फेब्रुवारी जन्मदिवस .

ज्या काळात निसर्गाच्या हिरवळीचे, स्त्री देहाचं सौंदर्याचं वर्णन करण्यात साहित्य व्यवस्था व्यस्त होती, त्या काळात नामदेव ढसाळांनी शिव्यांच्या ओव्या बनवून शब्दांची लाखोली वाहिली.
मराठी साहित्य क्षेत्राला प्रचंड जण हादरे दिले. त्यांच्या शब्दांना तलवारीची धार होती आणि कथेचा वास्तवाला गोलपीठा ची आग होती. या आगीत साहित्य क्षेत्र अक्षरशः होरपळून निघालं. इथल्या शोषित,पीडित, उपेक्षित समाजाला प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध बंड करण्याचं सामर्थ्य मिळालं.

या अंधार युगामध्ये जेव्हा नामदेवाचे शब्द हुंकारले, या नरकाच्या कोंडवाड्यात किती दिवस राहायचं आम्ही, आमचा श्वास गुदमरतोय, लक्तरात गुंडाळलेली आमची अब्रू गोलपिठ्यावर नागविर्‍यांनो तुमचा ऱ्हास जवळ आला आहे. तुमच्या पापाचे छीनाल घट फोडण्यासाठी शब्द म्हणाले अंधाराने सूर्य पाहिला. अशा शब्दात त्यांनी तत्कालीन प्रस्थापित व्यवस्थेला इशारा देऊन टाकला.

मग उषा किरणांच्या पायथ्याशी महारोग्यांच्या झोपड्यांना सुद्धा स्फुरण चढले आणि त्यांच्या रक्तात असलेल्या सूर्याने पेट घेतला आणि विषमतेच्या शहरा – शहराला त्यांनी आग लावली. त्या अग्निज्वाळेच्या लोळांना आपल्या पोटात सामावून सुसाट वेगाने धावत आला एक पॅंथर त्याच्या नखांना आणि त्याच्या दातांना शब्दांचे तेजाब चढवले होते. तो जेव्हा गुरगुरायंचा तेव्हा गेंड्याची कातडी धारण केलेल्या व्यवस्थेला अक्षरशः भोकं पडायची.
तो वाडा वस्ती येथे जाऊन म्हणू लागला.

रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो तूमची आय-बहीण
आजही विटंबली जाते हाटाहाटातून, मवाल्यासारखेय माजलेले उन्मत्त नीरो
आजही मेणबत्तीसारखी जाळतात माणसं चौकाचौकातून, कोरभर भाकरी, पसाभर पाणी यांचा अट्टाहास केलाच तर फीरवला जातो नांगर आजही घरादारावरून
चींदकातले हात सळसळलेच तर छाटले जातात आजही नगरानगरातून
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो किती दिवस सोसायची ही घोर नाकेबंदी?
मरेपर्यंत राहयचं का असंच युद्धकैदी?
ती पहा रे ती पहा, मातीची अस्मिता आभाळभर झालीय् माझ्याही आत्म्याने जिंदाबाद ची गर्जना केलीय्
रक्तात पेटलेल्या अगणित सुर्यांनो आता या शहराला आग लावीत चला!
हे जहाल वास्तव त्यांच्या गोलपिठा या कवितासंग्रहात त्यांनी उतरवले आणि मराठी साहित्य क्षेत्रात क्रांती घडवून आणली मराठी साहित्य क्षेत्राला नवी दिशा दिली‌. नामदेव ढसाळ यांच्या कवितेचे इंग्रजी, फ्रेंच, जर्मन यासह अनेक आंतरराष्ट्रीय भाषेत भाषांतर झाले. म्हणूनच मराठीतील जागतिक दर्जाचा महाकवी अशी त्यांची ओळख आजही कायम आहे.

1973 मध्ये त्यांच्या गोलपिठा यानंतर मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले, प्रियदर्शनी, आंबेडकरी चळवळ, खेळ, गांडू बगीचा मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात असे काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित झाले.
आंधळे शतक, हाडकी हाडवळ, बुद्ध धर्म काही विशेष प्रश्न, यासह अनेक पुस्तकं त्यांचे प्रकाशित झाली आहेत. कवितेतून हजारो सुर्य पेटवणारा महाकवीचे शरीर मात्र व्याधींनी जर्जर झाले आणि वयाच्या ६४ व्या वर्षी १५ जानेवारी २०१४ ला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे शब्द त्यांचे काव्य आजही चिरतरुण आहेत.
अश्या विद्रोहाच्या महाकवीला कोटी कोटी अभिवादन

विनोद अहिरे, पोलीस मुख्यालय जळगाव
९८२३१३६३९९
लेखक जळगाव जिल्हा पोलिस दलातील साहित्यिक/ कवी

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button