स्वेरीमधील सिलेज विकास प्रकल्पामुळे भाभा अणुसंशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पोहोचले थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
प्रतिनिधी रफिक आत्तार
पंढरपूर- नॅशनल सेंटर फॉर कंपोझिशनल कॅरॅक्टरायझेशन ऑफ मटेरियल (एन ट्रिपल सी एम) हैदराबादचे प्रमुख डॉ. संजीवकुमार यांनी स्वेरीला सदिच्छा भेट दिली. ते भाभा अणु संशोधन केंद्राच्या हैदराबादमधील युनिटचा कार्यभार पाहतात. त्यांनी नुकतीच रोपळे येथील आकृती केंद्रास भेट देऊन माहिती दिली आणि स्वेरीमधील ग्रामीण मानव संसाधन व विकास केंद्रास (आरएचआरडीएफ) ला भेट दिली व तेथील संशोधनासंबंधीची पाहणी करून माहिती जाणून घेतली.
खेडी आणि अत्याधुनिक शहरे या मध्ये वाढत गेलेली दरी आणि त्याचा समाजावर होत असलेला दुष्परिणाम भारताचे जेष्ठ शास्त्रज्ञ आदरणीय डॉ. अनिल काकोडकर यांनी पंचवीस वर्षापूर्वी ओळखला होता व त्याकरिता भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई मधील समाज उपयोगी तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकतो का? याबाबत विचार मंथन करून ‘सिलेज’ ही संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिला प्रकल्प स्वेरी संस्थेसोबत सामंजस्य करार करून गोपाळपूर येथे सुरु करण्यात आला. या प्रकल्पाअंतर्गत परमाणु उर्जा विभागाचे स्वेरी संस्थेमध्ये आऊट रीच सेंटर सुरु करण्यात आले. या आऊट रीच सेंटर मार्फत भाभा अणु संशोधन केंद्रामध्ये निर्मित झालेल्या समाज उपयोगी तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण दिले जाते. त्यामध्ये माती परिक्षण संच, पाणी शुद्धीकरण यंत्र, सोलार ड्रायर, बायोगॅस इत्यादींचा समावेश आहे. या आऊट रीच सेंटरचा (डीएई आऊट रीच सेंटर) उद्देश भाभा अणुसंशोधन केंद्रातील समाज उपयोगी तंत्रज्ञान ग्रामीण भागामध्ये आकृती या संकल्पनेच्या माध्यमातून उद्योग व रोजगार वाढवून ग्रामीण भागाचा शाश्वत विकास करणे हा आहे. तसेच या डी.ए.इ. आऊट रीच सेंटरच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न भाभा अनुसंशोधन केंद्राकडे पोहोचवून त्यावर उपयुक्त तंत्रज्ञान विकसीत करण्यासाठी शास्त्रज्ञांना सहाय्य करणे असा आहे. त्यास अनुसरून नॅशनल सेंटर फॉर कंपोझिशनल कॅरक्टराईझेशन ऑफ मटेरीयलचे प्रमुख डॉ. संजीव कुमार यांनी स्वेरी येथील सिलेज प्रकल्पाला भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी सिलेज प्रकल्पाअंतर्गत आकृतीच्या माध्यमातून रोपळे मधील शेतकऱ्यांशी संवाद साधला. डॉ. संजीवकुमार यांच्या सोबत त्यांचे सहायक डॉ. एम. व्ही. बाळरामकृष्णन, एस.थांगवेल व के.माधवी या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना फ्लोराईड, मर्क्युरी व क्रोमिअम या सारखे पाण्यातील विषारी पदार्थ कसे ओळखता येतात याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. तसेच गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खाऱ्या पाण्यामुळे पिकांवर होणाऱ्या दुष्परिणामांची पाहणी केली.डॉ. संजीवकुमार यांनी आपल्या भेटीमध्ये रोपळे या गावातील शेतातील खाऱ्या पाण्या बाबतचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये संशोधन सुरु करण्याचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या समस्या भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमामध्ये आकृती रोपळेचे संचालक परमेश्वर माळी, डी.ए.ई. आऊट रीच सेंटरचे प्रमुख गजेंद्र कुलकर्णी, संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. रणजित गिड्डे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार व इतर प्राध्यापक उपस्थित होते.
छायाचित्र- नॅशनल सेंटर फॉर कंपोझिशनल कॅरॅक्टरायझेशन ऑफ मटेरियल हैदराबादचे डॉ. संजीवकुमार यांचे स्वेरीत स्वागत करताना होण्यासाठी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सोबत डावीकडून संशोधन विभागाचे प्रमुख डॉ. रणजित गिड्डे, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, डॉ. एम. व्ही. बाळरामकृष्णन, एस.थांगवेल व के.माधवी.






