एकाच रात्री आरोपींनी केल्या तीन घरफोड्या : अटकेतील आरोपींविरुद्ध 35 गुन्हे दाखल
असद खाटीक
धुळे : जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशाने 3 रोजी पहाटे तीन ते सहा दरम्यान राबवण्यात आलेल्या कोम्बिंगमध्ये दोन अट्टल चोरटे धुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. विशेष म्हणजे आरोपी अट्टल दरोडेखोर असून त्यांच्याविरुद्ध चोरी व जबरी चोरीचे आतापर्यंत तब्बल 35 गुन्हे दाखल आहेत. इम्रान उर्फ बाचक्या शेख खलीद व वसीम जैनुद्दीन शेख असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.
नाकाबंदीत गवसले चोरटे
धुळे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जाकीर शेख हुसेन (पदमनाभ नगर, साक्री रोड, धुळे) यांच्या घरात घरफोडी झाल्याची माहिती मिळाल्यानंतर धुळे शहर पोलिसांनी या परीसरात नाकेबंदी लावली तर पहाटे दोघे चोरटे भरधाव वेगाने मोगलाईकडे जाताना दिसल्याने त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळण्यात आल्या. आरोपींच्या ताब्यातून सोन्याची पोत, लहान मुलांचे दागिने व मोबाईल मिळून 39 हजार 40 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच चोरी करण्यासाठी लागणारे हत्यार टॉमी व स्क्रु ड्रायव्हर व 25 हजार रुपये किंमतीची पल्सर दुचाकी जप्त करण्यात आली. आरोपींनी कुमार नगर परीसरातील मंदिराची दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम लांबवल्यासह अन्य दोन घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. अवघ्या दोन तासात या चोरीतील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
एका आरोपीवर जाहीर झाले होत बक्षीस
अटकेतील आरोपी इम्रान उर्फ बाचक्या शेख विरुद्ध मालेगाव पोलिसात अग्निशस्त्र प्रकरणी गुन्हा दाखल असून तो या गुन्ह्यात वॉण्टेड असल्याने त्याच्याविरुद्ध मालेगाव पोलिसांनी बक्षीसदेखील जाहीर केले होते.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, सहाय्यक निरीक्षक श्रीकांत पाटील, हवालदार भिकाजी पाटील, मुक्तार मन्सुरी, योगेश चव्हाण, सतीश कोठावदे, प्रल्हाद वाघ, पंकज खैरमोडे, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी, सचिन साळुंखे, अविनाश कराड, नवल वसावे, वाहन चालक भदाणे आदींच्या पथकाने केली.






