मोठ्या पक्षाचे नाव घेत पदाधिकाऱ्याची दादागिरी मारहाण करून त्यांनाच दिली गुन्हे दाखल करण्याची धमकी
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर मी राज्यातील विद्यमान सरकारमधील एका प्रमुख पक्षाचा मोठा पदाधिकारी आहे.तुम्ही माझ्या पाहुण्यांना त्रास दिला आहे. मी तुम्हाला सोडणार नाही,तुमच्यावर हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करतो असे म्हणत बाहेरून लोक आणून पिराची कुरोली येथील शेतकऱ्यांना मारहाण करून उलट त्यांच्यावरच गुन्हा दाखल करण्याची धमकी एका कथित नेत्याने दिली असल्याची तक्रार करणारे निवेदन पिराची कुरोली येथील मच्छिमार व शेतकरी यांनी काल अशा आशयाचे निवेदन भाजपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख व मनसेचे राज्य सचिव दिलीप धोत्रे यांना देऊन सदर प्रकरणात आम्हाला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.याबाबत सदर शेतकऱ्यांनी दिलेली माहिती अशी की सरकारी पक्षाच्या एका कथित नेत्याचे पाहुणे महावीर भीमराव सावंत यांची पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे सदर तक्रारदार शेतकऱ्यांच्या शेजारी जमीन आहे.या शेतकऱ्यांच्या शेतीचे छोटे छोटे तुकडे असून यावर उदरनिर्वाह होत नाही म्हणून शेतीबरोबरच आपला पारंपरिक मासेमारी व्यवसाय करून आपली उपजीविका चालवत आहेत.गेल्या काही वर्षात सदर शेतकऱ्यांनी आपल्या शेतजमिनीत महावीर भीमराव सावंत यांनी अतिक्रमण केले असून शेतात मधोमध बांध घालून विजेचा पोल रोवला असून उताऱ्यावर असल्याप्रमाणे जमिनीची मोजणी करून मिळावी असा अर्ज पंढरपूर येथील भूमिअभिलेख कार्यालयाकडे दोन महिन्यांपूर्वी दिला आहे.याचा राग मनात धरून कथित नेत्याने बाहेर गावातून काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना बोलावून मंगळवार दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी तक्रारदार संजय तुळशीराम भुई याला बेदम मारहाण केली.यावेळी मारहाण होण्याअगोदर पोलिसांना फोन करून बाहेरील लोक गोळा होत आहेत आम्हाला मारहाण होईल त्यामुळे पोलिसांनी येऊन आम्हाला लवकर मदत करावी अशी विनंती केली होती.मात्र पोलीसांना यायला थोडासा उशीर झाल्याने बाहेरून आलेल्या गुंडांनी सदर शेतकऱ्यांना बेदम मारहाण केली.तसेच यावेळी सदर नेत्याने पोलीस आल्यानंतरही त्यांच्यासमोरच सदर शेतकऱ्यांना धमकी देऊन शिवीगाळ केली.तसेच मारहाण करूनही मी राष्ट्रवादीचा मोठा नेता आहे,माझ्या खूप ओळखी आहेत मी तुम्हाला सोडणार नाही,तुमच्यावर हाफ मर्डरची केस दाखल करतो,मोजनीचा अर्ज मागे घ्या आणि मी मोजून देईन तेवढी जमीन गपगुमान घ्या नाहीतर तुमचं काही खरं नाही.माझ्या सगळीकडे ओळखी आहेत,सगळीकडे खोटी निवेदने देऊन मी तुम्हाला जेलमध्ये सडवून टाकेन अशी धमकी दिल्याचे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे.सरकारी पक्षाचे नाव घेऊन आम्हाला हा बाहेर गावचा कथित नेता वारंवार धमकावत असून सदर नेत्यापासून आमच्या जीवाला धोका आहे.आमच्या जीवाचे काहीही बरेवाईट झाल्यास या नेत्याला जबाबदार धरण्यात यावे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.त्यामुळे सदर प्रकरणात एका प्रमुख सरकारी पक्षाचे नाव घेऊन धमकावल्याची तक्रार दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.याबाबत उद्या सोलापूर पोलीस अधीक्षक सातपुते मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर व पालकमंत्री सोलापूर यांना भेटून योग्य व खरा तपास करून जे सत्य आहे ते बाहेर काढून आम्हाला न्याय मिळावा यासाठी निवेदन देणार असल्याचे सदर शेतकऱ्यांनी सांगितले.आम्ही भटक्या समाजातील असल्यामुळे एका चांगल्या पक्षाच्या नेत्याकडून आमच्यावर सतत असा अन्याय केला जात असेल तर आम्ही आत्महत्या करावी का असा उद्विग्न सवालही यावेळी सदर शेतकऱ्यांनी केला.






