Pandharpur

? अवैध वाळू वाहतुकीने घेतला बळी !पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार; पती गंभीर जखमी

अवैध वाळू वाहतुकीने घेतला बळी !पिकअपच्या धडकेत दुचाकीवरील महिला ठार; पती गंभीर जखमी

पंढरपूर रफिक अत्तार

वाळूचा अवैध उपसा करून भरधाव वेगात निघालेल्या पिकअप वाहनाने जुपिटर स्कूटरला जोराने धडक दिल्याने स्कूटरवरील महिला जागीच ठार झाली तर गंभीर जखमी झालेल्या तिच्या पतीला उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले. हा अपघात आज (ता. 15) सकाळी सहाच्या सुमारास येथील अंबाबाई मैदानाजवळील नवीन पुलावर झाला.
वाळू माफियांच्या वाहनाने यापूर्वी देखील अनेकांचा जीव घेतला आहे; परंतु पोलिस आणि महसूल विभागातील काही अधिकारी या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चंद्रभागा नदीच्या पैलतीरावर 65 एकर परिसरात दररोज सकाळी शहरातील अनेक महिला व पुरुष मॉर्निंग वॉकसाठी जातात.
आज पहाटे नेहमीप्रमाणे गोविंदपुरा भागात राहणारे प्रकाश बारले आणि त्यांच्या पत्नी जयश्री या जुपिटर स्कूटरवरून 65 एकर परिसरात गेले होते. तिथे नेहमीप्रमाणे फिरणे झाल्यावर ते दोघे गाडीवरून घराकडे परत येत असताना भरधाव वेगात आलेल्या विना क्रमांकाच्या पिकअप वाहनाने जुपिटर स्कूटरला जोराने धडक दिली. या अपघातात जयश्री बारले यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचे पती प्रकाश बारले हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवण्यात आले आहे.
चंद्रभागा वाळवंटातून शेकडो गाढवे आणि वाहनातून बेकायदेशीररीत्या अहोरात्र वाळू उपसा सुरू असतो. त्यामुळे वाळवंटात मोठमोठे खड्डे पडले आहेत. भक्तराज पुंडलिक मंदिरासह लगतच्या समाध्यांनाही वाळू उपशामुळे धोका निर्माण झाला आहे.
कोळी बांधवांसह अनेकांनी वाळू उपसा थांबवण्यासाठी आंदोलने केली; परंतु महसूल आणि पोलिस प्रशासनातील काही अधिकारीच वाळू उपशाकडे सोयीस्कर काणाडोळा करत आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस वाळू चोरटे मुजोर होत असून, भरधाव वेगात वाहने चालवून अपघातास कारणीभूत होत आहेत. संबंधित वाळू चोरट्यांशी पोलिस आणि महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांची “अर्थ’पूर्ण मैत्री असल्याने वाळू उपसा कायमस्वरूपी थांबू शकत नसल्याचे बोलले जात आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button