Ausa

शेतकरी संघटनेचे ‘गळ्यात कांद्याच्या माळा,मुठभर कापुस जाळा’ आंदोलन

शेतकरी संघटनेचे ‘गळ्यात कांद्याच्या माळा,मुठभर कापुस जाळा’ आंदोलन

औसा प्रतिनिधी:-प्रशांत नेटके

कापुस खरेदी बाबत होत असलेली दिरंगाई व कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी व शासनाचा निषेध करण्यासाठी शेतकरी संघटनेने राज्यभर गळ्यात कांद्याच्या माळा घालून मुठभर कापुस जाळण्याचे आंदोलन केले. २२ मे रोजी सकाळी ११ वाजता भंगेवाडी ता.औसा येथे गळ्यात कांद्याच्या माळा घालुन मुठभर कापुस जाळण्याचे आंदोलन केले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांनी पत्रकारांना दिली अाहे.
कोरोनाच्या पार्श्वभुमिवर बंद केलेली शासकीय कापुस खरेदी पुन्हा सुरु केली असली तरी अत्यंत धिम्या गतीने खरेदी सुरु आहे तसेच एफ.ए.क्यू. च्या फक्त एकाच ग्रेडची खरेदी सुरू आहे. मध्यम व आखुड धाग्याच्या कापसाची खरेदी सुरु करावी व सरकारकडे यंत्रणा अपुरी असल्यास , भावांतर योजना सुरु करावी या शेतकरी संघटनेच्या कापसा संबंधी मागण्या आहेत. मात्र सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे केंद्र व राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी दि.२२ मे रोजी सकाळी ११ वाजता एकाच वेळी, पुर्ण महाराष्ट्रभर मुठभर कापुस जाळण्याचे आंदोलन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी जाहीर केले होते. राज्यातील सर्व जिल्ह्यात हजारो शेतकर्‍यांनी या आंदोलनात भाग घेऊन निषेध व्यक्त केला.

केंद्र शासनाने कांद्याची निर्यातबंदी हटवली आहे व तात्पुरता कांदा अावश्यक वस्तूंच्या यादीतुन वगळला आसला तरी कांद्याचे भाव कोसळले आहेत. केंद्र शासनाने मोठ्या उद्योगांना सावरण्यासाठी मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत मात्र अडचणीत असलेल्या कांदा शेतकर्‍यांना सावरण्यासाठी केहीच केले नाही. नाफेड मार्फत २००० रुपये प्रती क्विंटल प्रमाणे शासनाने कांदा खरेदी करावा अशी शेतकरी संघटनेची मागणी आहे. कांदा उत्पादक पट्ट्यातील शेतकर्‍यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालुन कापुस जाळण्याचे आंदोलन लॉकडाउनचे सर्व नियम पाळुन करण्यात आले.

कांदा व कापुस उत्पादक शेतकर्‍यांच्या भावना व नाराजी सरकार पर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी संघटनेने हे आंदोलन केले. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, माधव कंदे,माधव मल्लेशे, वसंत कंदगुळे, निलेश कंदगुळे, विठ्ठल संपते, जनार्दन कंदगुळे, संजय सुर्यवंशी आदिंसह शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी विशेष प्रयत्न केले असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button