मयत आकाश रोकडेच्या कुटुंबाला मसनेची मदत
पत्नी आईच्या नावे काढली विमा पाॅलीसी
प्रतिनिधी रफिक आतार
पंढरपूर,ता.13: हमाली करण्यासाठी गेलेल्या येथील आकाश रोकडे या तरुणाचा अलीकडेच हार्ट अटॅकने मृत्यु झाला आहे. कुंटुबाचा आधारच गेल्याने मयत आकाश रोकडे यांचे कुटुंब उघड्यावर आले आहे. कुटुंबाला आधार म्हणून मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी तीन महिने पुरेल इतके अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू देवून आकाशाच्या कुटुंबाला आधार देेण्याचा प्रयत्न केला आहे. अन्य दानशूर लोकांनी ही रोकडे कुटुंबाला यथाशक्ती मदत करावी असे आवाहन श्री.धोत्रे यांनी केले.भविष्याचा आधार म्हणून पत्नी आणि आईच्या नावे विम्या पाॅलीशी काढून विम्याचे कवचही दिले आहे. पोलिस निरीक्षक अरूण पवार यांच्या उपस्थितीत मदत आणि विमा पाॅलीशीचे सर्टिफिकेट देण्यात आले.आकाश रोकडे यांचे स्टेशन रोडवर इलेक्ट्रीक वस्तू विक्रीचे छोटेसे दुकान होते. लाॅकडाऊनमुळे व्यवसाय बंद पडला होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी दुसरे कोणतही साधन नसल्यामुळे आकाशवर हमाली करण्याची वेळी आली. येथील रेल्वे स्टेशनवर धान्याची पोती उचलण्याचे काम करताना 1 मे रोजी त्याच्या छातीच कळा सुरु झाल्या होत्या. त्यानंतर त्याला येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंंतु उपचारा दरम्यान आकाशचा दुर्दैवी मृत्यु झाला.
आकाशच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन वर्षाचा एक लहान मुलगा असा परिवार आहे. घरातील कर्ता एकुलता एक मुलगा गेल्याने आई वडीलांचा आधार गेला. तर पत्नी आणि मुलगावर आभाळ कोसळले आहे.आकाशच्या मृत्यु नंतर व लाॅकाऊनमुळे या कुटुंबावर अधिकच संकट ओढवले आहे. सध्या या कुुटुंबाला मदतीची गरज होती. याच वेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी त्यांच्या घरी जावून गहू,तांदुळ, साखर, तेल, शेंगदाणे, डाळ,पोहे, तिखट असे अन्नधान्यासह जीवनावश्यक वस्तू दिल्या याचवेळी पत्नी आणि आईच्या नावे प्रत्येकी दोन लाख रुपयांची विमा पाॅलाशी काढून त्यांना विमा संरक्षण ही दिले आहे.यावेळी पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण पवार यांच्या हस्ते विमा पाॅलीशीचे वितरण करण्यात आले.यावेळी मनसेेचे नेते दिलीप धोत्रे, तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिध्देश्वर गरड, उपप्रमुख महेश पवार, सागर घोडके,अर्जून जाधव,समाधान डुबल आदी उपस्थित होते.






