Pune

उजनी धरण क्षेत्रातील प्राचीन ‘हेमाडपंथी’ दगडी मंदिराची दुरावस्था

उजनी धरण क्षेत्रातील प्राचीन ‘हेमाडपंथी’ दगडी मंदिराची दुरावस्था

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे:उजनी धरणातील पाणी फुगवटा धरल्यानंतर पुर्नवसन झालेल्या पळसदेव गावच्या वैभवात भर घालणारे प्राचीन हेमाडपंथी दगडी मंदिराची दुरावस्था झाली आहे. दरवर्षी उजनी धरण भरल्यानंतर पाण्याखाली जाणारे हे मंदिर उन्हाळ्यात पूर्णपणे उघडे पडते. या मंदिराच्या दगडांवर विविध प्रकारची शिल्पे साकारण्यात आलेली असल्याने मंदिर आकर्षित वाटत आहे. रामायणाची माहिती सांगणारी ही शिल्पे असल्याने, पुरातन काळातील हा दुर्मिळ ठेवा जतन करण्याची गरज असल्याचे जाणकारातून बोलले जात आहे.

भिमा नदीच्या तीरावर वसलेल्या पळसदेव गावाचे सन १९७६ मध्ये उजनी धरणामुळे पुर्नवसन झाले. नदीच्या काठावरील या गावचा प्रमुख व्यवसाय हा शेती होता. धरण बांधणीनंतर या ग्रामस्थांचे गावालगतच्या टेकडीवर पुर्नवसन करण्यात आले. पुर्नवसन झाले खरे, मात्र ग्रामस्थांनी आपल्या जमिनी, घरे, मंदिरे आहे त्या स्थितीत सोडून दिले. केवळ ग्रामदैवत पळसनाथाच्या मंदिराचे स्थलांतर करण्यात आले. जुन्या मंदिरातील महादेवाची पिंड नवीन मंदिरात स्थापन करण्यात आली. तर हे जुने दगडी मंदिर मात्र आहे त्याच स्थितीत ठेवण्यात आले.

गेली साडेतीन दशकांचा कालावधी उलटला तरी मंदिराने आपले अस्तित्व टिकवले आहे. काही ठिकाणी मंदिराची पडझड झाली आहे. अनेक दुर्मिळ शिल्पे खाली पडलेली आहेत. काही शिल्पांचे तुकडे झाले आहेत. तुकडे झालेले शिल्प (दगड) येथील नागरीक घरे बांधण्यासाठी ट्रँक्टरच्या ट्रँक्टर भरुन नेताना दिसत होते. प्राचीन काळातील स्थापत्य कलेच्या अचाट सामर्थ्याचा दाखला देणाऱ्या या मंदिराचे जतन होणे गरजेचे आहे. यासाठी पुरातत्व विभागाने पुढाकार घेवून ग्रामस्थांच्या माध्यमातून हा प्राचीन वारसा जपण्यासाठी प्रयत्न करणे महत्वाचे आहे. तसेच त्याचे पावित्र्य जपण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button