सरणवाडी येथिल विहिरीच्या कामात लाखो रुपयाचा अपहार
अपहारकर्त्यांवर कुठलीही कारवाई होईना ? कार्यवाही टाळण्यासाठी कोणाचा अभय ?चर्चेला उधान
परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे
परंडा तालुक्यातील सरणवाडी येथिल मग्रारोहयो अंतर्गत सार्वजनिक विहिरीच्या मापात पाप करून लाखो रुपयाचा अपहार झाल्याचे उघड होऊनही अद्याप अपहार कर्त्यांवर कुठलीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याने याबाबत तालुक्यामध्ये उलटसुलट चर्चान उधान आले आहे.
सरणवाडी येथिल सार्वजनिक पाणीपुरवठा विहीरीचे खोदकाम पुर्ण न करता बांधकाम करून त्याची बिले उचलण्यात आली असल्याचे वृत्त दि. २३ जुन रोजी दै. एकमतमध्ये प्रकाशीत केले होते. त्या अनुशंगाने गटविकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी मार्फत विहीरीचा पंचनामा केला होता. त्यामध्ये विहीरीचे खोदकाम ९.३० मिटर केल्याचे निदर्शनास आले मात्रा विहीरीचे खोदकाम १३.५० मिटर असल्याचे कागदोपत्री दाखवुन ४.२० मिटर खोदकामातील लाखो रुपयाचा अपहार झाल्याची माहीती उघडकीस आल्यावर गटविकास अधिकारी चकोर यांच्याकडून २५ जुलै रोजी शाखा अभियंता, ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक या तिघांना अपहार रक्कम समप्रमाणात भरून तिन दिवसात याबाबत खुलासा सादर करावा अन्यथा कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल अशी नोटीस बजावली होती.
यामध्ये अपहारीत रक्कम न भरता ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक यांनी खुलासा सादर केल्याचे कळते. त्यानंतर सदर विहीरीचा उप अभियंता भुम यांनी पंचनामा केला असता विहीरीच्या खोदकामात ४.६० मिटरची तफावत असल्याचे निदर्शनास आले. अपहारकर्त्यांनी अद्यापपर्यंत अपहार रक्कम भरली नसुन त्यांच्यावर गुन्हा दाखल का करण्यात आला नाही ? अपहारकर्त्यांना कोन पाठीशी घालत आहे ? याबाबत तालुक्यामध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. याप्रकरणी गटविकास अधिकारी कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






