Aurangabad

धनदांडग्यांना घरकुल मात्र गोरगरीब जनता योजनेपासून वंचित – माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे

धनदांडग्यांना घरकुल मात्र गोरगरीब जनता योजनेपासून वंचित – माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे

गणेश ढेंबरे औरंगाबाद

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्याला निष्क्रिय मंत्री लाभल्याने पैठण शहरातील गोरगरीब नागरिक घरकुल योजनेपासून वंचित आहेत. तसेच दुसरीकडे धनदांडग्याना घरकुल मिळतात, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ताभाऊ गोर्डे यांनी केला आहे. गोरगरिबांना हक्काचे घरकुल मिळाले पाहिजे, या प्रमुख मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, आय काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनांच्या वतीने पैठण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आज भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विनोद पाटील तांबे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब निर्मळ, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माऊली मुळे, माजी नगराध्यक्ष अनिल घोडके यांच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थीतीत जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. गरिबांच्या घरावर ज्यांनी मारला डल्ला, त्यांच्या विरोधात आमचा कायदेशीर हल्ला, अशा जोरदार घोषणा कार्यकर्त्यांनी यावेळी देऊन परिसर दणाणला होता. भूमिअभिलेख विभाग व नगरपरिषद पैठणच्या वतीने शहरातील फक्त 535 अतिक्रमणधारकांचे सर्व्हे करण्यात आले.

यापैकी फक्त 7 लोकांच्या जागेची मोजणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले. यामध्ये दारू व्यावसायिक, शिक्षक, मुख्याध्यापक, जे मंत्री संदीपान भुमरे यांचे नातेवाईक असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्ता गोर्डे यांनी यावेळी केला. पैठण शहरात अतिक्रमणधारकांचा जो सर्व्हे झाला आहे. मंत्री संदीपान भुमरे यांनी अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करुन आपल्या जवळच्या धनदांडग्यांच्या लोकांचा यादीमध्ये समावेश केला. अशा लोकांची नावे रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी विविध पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button