परिश्रमाशिवाय यश नाही पालक प्रतिनिधी अशोक नरळे
स्वेरीज् बी. फार्मसीमध्ये पालक मेळावा संपन्न
प्रतिनिधी रफिक आत्तार
पंढरपूर- ‘ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या कलागुणांमध्ये प्रगती दिसून येते, त्याठिकाणच्या शिक्षणात कोणत्याही गोष्टीची कमतरता नसते. कष्ट, परिश्रम आणि संघर्षाशिवाय यश मिळत नाही. त्यामुळे ‘स्वेरी.मध्ये संस्थापक सचिव डॉ. बी.पी. रोंगे सरांच्या मार्गदर्शनाखाली मिळणारे शिक्षण उत्तम पद्धतीचे असल्यामुळे आमच्या पाल्यांचा येथे विकास होत आहे. त्यामुळे आम्ही पालक वर्ग मनापासून समाधानी आहोत. पालकांना नेमके काय पाहिजे हे ओळखून स्वेरीने तशी शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून दिल्यामुळे आमच्या पाल्यांचा नंबर ‘स्वेरी’त कसा लागेल याकडेच अधिक लक्ष असते.’ असे प्रतिपादन पालक प्रतिनिधी अशोक नरळे यांनी केले.
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँन्ड रिसर्च इन्स्टिटयुट संचलित बी.फार्मसीच्या पालक मेळाव्यात पालक प्रतिनिधी म्हणून अशोक नरळे मार्गदर्शन करत होते. यावेळी महिला पालक प्रतिनिधी म्हणून श्रीमती शोभा सावंत ह्या देखील व्यासपीठावर उपस्थित होत्या. दीप प्रज्वलनानंतर प्रा. रामदास नाईकनवरे यांनी महाविद्यालयाची संपूर्ण माहिती दिली आणि उपलब्ध सोयी सुविधा सांगितल्या. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे असणारी ‘कमवा आणि शिका’ योजना, सोलार पॉवर प्लांट, प्ले ग्राउंड, व्यायामासाठी जिमखाना, एन.के.एन., वाचनालयात उपलब्ध असलेली अभ्यासक्रमाची व स्पर्धा परीक्षेसाठी लागणारी संदर्भ पुस्तके, वसतिगृहातील सुविधा, वाहतुकीसाठी बस, १०२४ एम.बी.पी.एस. क्षमतेची वाय-फाय इंटरनेट सुविधा, फीडबॅक सिस्टम तसेच औषधांची निर्मिती कशी होते हे पाहण्यासाठी थेट इंडस्ट्रीयल व्हिजीट आदी फार्मसी निगडीत आवश्यक सुविधांची सविस्तर माहिती दिली. तसेच एन.बी.ए. मानांकन प्राप्त झाले असून त्याचे वेगळेच महत्व असल्याचे सांगितले. यावेळी जी.पी.ए.टी. (ग्रॅज्युएट फार्मसी अॅप्टीटयूड टेस्ट) २०२० या राष्ट्रीय पातळीवरील परिक्षेत उज्ज्वल यश मिळविलेल्या तब्बल १७ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. काही पालकांनी ऐनवेळी उपस्थित केलेल्या सूचनांची नोंद करून घेतली आणि त्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने सोडविल्या जातील अशी ग्वाही दिली. प्राचार्य डॉ. अमित गंगवाल यांनी पालकांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी सोलापूर जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातील असे मिळून जवळपास २०० पालक, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. स्नेहल चाकोरकर व प्रा. मंदाकिनी होळकर यांनी सूत्रसंचालन केले तर उपस्थितांचे आभार प्राचार्य डॉ. अमित गंगवाल यांनी मानले.






