भरधाव वेगाने राख वाहतूक करणाऱ्या डंपरने घेतला 10 जणांचा बळी, 7 जण जबर जखमी.
यावल तालुक्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा भीषण अपघात
अवैध गौण खनिजाने काठोकाठ भरलेल्या भरगाव वेगाने जाणाऱ्या गाड्या आणि सुस्त प्रशासनाचे बळी
सुरेश पाटील
यावल दिनांक 3 ता. प्र. तालुक्यातील यावल फैजपूर रस्त्यावर हिंगोणा गावाजवळ मोर धरण कॉलनीजवळ वळणावर काल दिनांक 2 रविवार रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास एका भरधाव वेगाने वाहतूक करणाऱ्या डंपरने समोरून येत असलेल्या भरधाव वेगात असलेल्या क्रुझर वाहनास जोरदार धडक दिल्याने क्रुझर चक्काचूर होऊन क्रुझर मधील एकूण 10 जण अपघातात ठार झाले, तर 7 जण जबर जखमी झाल्याची घटना घडल्याने संपूर्ण यावल, रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

अपघाताचे वृत्त कळताच हिंगोणा ग्रामस्थांसह यावल व फैजपूर पोलिसांनी तसेच माजी आमदार हरिभाऊ जावळे, यावल येथील डॉक्टर कुंदन फेगडे, डॉक्टर नीलेश गडे, माजी नगरसेवक उमेश फेगडे, बाळू फेगडे , व्यंकटेश बारी, प्राध्यापक मुकेश येवले यांनी व ईतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांनी स्वतः उपस्थित राहून मदत कार्य सुरू ठेवले आहे.
अपघातानंतर क्रुझर वाहनाचा चालक धनंजय तायडे वाहनातच अडकला असता त्याला वाहनातून बाहेर काढण्यासाठी जेसीबी मशीन चा वापर करावा लागला.
रविवारी रात्री चोपडा येथून लग्न समारंभ तथा रिसेप्शनचा कार्यक्रम आटपून चिंचोल तालुका मुक्ताईनगर येथील चौधरी कुटुंबीय क्रुझर वाहन क्रमांक एम. एच . 19-CV-1772 याचा चारचाकी वाहनाने यावल फैजपूर कडून मुक्ताईनगर कडे जात होते त्यावेळी हिंगोणा गावाजवळ मोर धरण वसाहत जवळ फैजपूर कडून येणाऱ्या डंपर क्रमांक MH-19-7758 या वाहनांची समोरासमोर जोरदार धडक बसुन
या अपघातात एकूण 10 जण ठार झालेली आहेत त्यांची नावे खालील प्रमाणे प्रभाबाई प्रभाकर चौधरी वय 45 राहणार चिंचोल, सोनाली जितेंद्र चौधरी वय 35 राहणार चिंचोल, तालुका मुक्ताईनगर, सोनाली सचिन महाजन वय 37 राहणार चांगदेव, तालुका मुक्ताईनगर, मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी वय 55, प्रभाकर नारायण चौधरी वय 60, अश्लेषा उमेश चौधरी वय 27 राहणार चिंचोली तालुका मुक्ताईनगर, प्रियंका नितीन चौधरी वय 25 राहणार चिंचोल, प्रिया जितेंद्र चौधरी10 राहणार चिंचोल, सुमनबाई श्रीराम पाटील वय 60 राहणार निंबोल,संगीता मुकेश पाटील वय 30 राहणार निंबोल तालुका मुक्ताईनगर, असे एकूण दहा जण अपघातात ठार झालेले आहेत यातील अनुक्रमे 6 जणांचा मृतदेह यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल आहे, तर इतर 4 जणांचा मृतदेह जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी दाखल आहेत.
तसेच अन्वी नितीन चौधरी, मीना प्रफुल्ल चौधरी, सुनिता राजाराम चौधरी, शुभम प्रभाकर चौधरी, सर्वेश नितीन चौधरी, संतनु मुकेश पाटील, आदिती मुकेश पाटील, हे सात जण जखमी असल्याने त्यांच्यावर औषधोपचार सुरु आहेत.
? गौण खनिजाची वाहने सुसाट वेगात, आणि संबंधित अधिकाऱ्यांची कारवाई अर्थपूर्ण कासवगतीने
यावल तालुक्यात यावल फैजपुर या प्रमुख शहरासह ठिक ठिकाणच्या गावांमध्ये विशेष करून रात्रीच्या वेळेस अवैध गौण खनिज,वाळू ,माती, व दीपनगर येथून राख वाहतुकीचा मोठा अवैध गोरखधंदा मोठ्या प्रमाणात सुरू असून यात संबंधित ट्रॅक्टर, डंपर चालक सुसाट वेगाने आपली वाहने चालवित असतात, याकडे आर.टी.ओ. अधिकारी कर्मचारी, रात्रीचे पेट्रोलिंग करणारे संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांच्यासह सर्कल तलाठी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांची एक मोठी यंत्रणा निर्माण झालेली आहे यात संपूर्ण यावल तालुक्यात दर महिन्याला कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असून वाळू, माती व बांधकाम साहित्याचे दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. यासोबत आता सुसाट वेगात वाहनांची मोठी वर्दळ रात्रंदिवस सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होणार असल्याचे स्पष्ट चित्र निर्माण झाले आहे.
यावल ग्रामीण रुग्णालयात मृतांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी माजी आमदार हरिभाऊ जावळे, डॉक्टर कुंदन फेगडे, डॉक्टर निलेश गडे, बाळू फेगडे, उमेश फेगड़े, वेंकटेश बारी व उपस्थित कार्यकर्ते छायाचित्रात दिसत आहेत.






