Yawal

लग्नानंतर नवरी अवघ्या पाच दिवसांत पैसे घेऊन फरार यावलच्या तरुणाची ९४ हजारांत फसवणूक

लग्नानंतर नवरी अवघ्या पाच दिवसांत पैसे घेऊन फरार यावलच्या तरुणाची ९४ हजारांत फसवणूक

रजनीकांत पाटील यावल

यावल : यावल शहरातील एका शेत मजुरी करणाऱ्या तरुणाकडून ६३ हजार रुपये घेऊन जालना येथील तरुणीशी लग्न लावून दिले. मात्र अवघा पाच दिवस संसार करून त्या नववधूने रोख रकमेसह ३१ हजारांचा ऐेवज घेऊन पोबारा केला. ही घटना ७ ते १२ नोव्हेंबर दरम्यान घडली. या प्रकरणी येथील पोलिसांत नववधूसह चौघांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणातील एका दलाल महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

येथील डिगंबर देविदास फेगडे (वय ३३) रा. महाजन गल्ली या तरुणाने या प्रकरणी फिर्याद दिली. त्या नुसार ६ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील अकलुद येथे फेगडे यांना एका इसमाने लग्नासाठी मुलगी बघायला बोलावले होते. तेथे बहिणाबाई रावसाहेब अंबुरे, रा. दर्गा रोड, परभणी हिने साहेबराव कोळी, अनिल परदेशी यांच्या समक्ष सोनाली कुऱ्हाडे, रा. जालना हिस दाखवले व लग्नाकरिता ६३ हजार रुपये द्यावे लागतील असे सांगितले. तेव्हा फेगडे यांनी पैसे दिले आणि ७ नोव्हेंबर रोजी येथील महाजन गल्लीतील श्री विठ्ठल मंदिरात लग्नसोहळा पार पडला.

पाच दिवसांच्या संसारानंतर १२ नोव्हेंबर रोजी दुपारी मंदिरात जाते असे सांगत सोनाली हीने पोबारा केला. घरातून जाताना लग्नावेळी तिच्या अंगावर घातलेले २५ हजारांचे दागिने, घरातील नव्या ५ हजार रुपयांच्या साड्या, मोबाईल असा एकूण ३१ हजार ३०० रुपयांचा ऐवजही घेऊन गेली. हा प्रकार लक्षात येताच तिचा सर्वत्र शोध घेतला.

मध्यस्थी असलेल्या सर्वांना विचारपूस केली. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने फेगडे यांनी शनिवारी येथील पोलिसांत बहिणाबाई रावसाहेब अंबुरे, साहेबराव कोळी, अनिल परदेशी व नववधू सोनाली कुऱ्हाडे, रा. जालना यांनी संगनमताने दलाली म्हणून ६३ हजार व सोनाली कुऱ्हाडे हिने नेलेले ३१ हजार ३०० रुपयांचा ऐवज असा एकूण ९४,३०० रुपयांमध्ये फसवणूक केली म्हणून चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. या प्रकरणी एका महिलेस पोलिसांनी ताब्यात घेतले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button