बिडीओंच्या आशीर्वादाने आरोग्य पर्यवेक्षकांचा मनमानी कारभार पंढरपूर पंचायत समितीत किरकोळ कामासाठी मारावे लागतात एकेक महिना हेलपाटे निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांवर नियंत्रण कोणाचे?
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : पंढरपूर नवजात बालकांच्या जन्मनोंदी घेण्यासाठी सरकोली ता.पंढरपूर येथील महिला आरोग्य कर्मचाऱ्यांकडून व आशा वर्कर महिलांकडून टाळाटाळ केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.त्यामुळे नवजात बालकांच्या पालकांना जन्मनोंद देण्यासाठी विणकारण नाहक त्रास सहन करावा लागत आहे.त्यातही खेदाची बाब म्हणजे ही जन्मनोंद करून मिळावी यासाठी पंढरपूर पंचायत समितीच्या आरोग्य विभागावर अवलंबून असणाऱ्या लोकांना एका जन्मनोंदीसाठी एकतर अधिकारीच जागेवर नसल्याने किंवा
अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे महिना महिना पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याने व सोबतच अधिकाऱ्यांकडून मुद्दामहून दिल्या जाणाऱ्या चुकीच्या माहीतीमुळे मोठा मनस्ताप व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
एखाद्या एका वर्षाच्या आतील वय असणाऱ्या बालकाची जन्मनोंद काही कारणाने करावयाची राहुन गेल्यास जन्मनोंद करून मिळावी यासाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या नावे अर्ज करून प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते.हे काम पंढरपूर पंचायत समितीत आरोग्य पर्यवेक्षक पी. आर जावळे यांच्याकडे आहे.मात्र हे प्रतिज्ञापत्र व अर्ज कसा करायचा असतो त्याचा नमुना कसा असतो याची माहिती देण्यासाठी आठ ते दहा दिवसांचे हेलपाटे मारावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.याबाबत पंढरपूरचे पत्रकार समाधान भोई यांना आलेला अनुभव बोलका आहे. समाधान भोई यांच्या मुलीची जन्मनोंद सरकोली येथील महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चुकीमुळे राहून गेली होती.त्यामुळे ती जन्मनोंद करून घेण्यासाठी पंचायत समितीतील आरोग्य विभागाचे निरीक्षक जावळे यांच्याकडे जाण्यास सांगण्यात आले.यावेळी त्यांनी जावळे यांना कॉल करून माहिती विचारली असता त्यांनी मी आल्यावर सांगतो आता मी कामात आहे असे सांगून तब्बल पाच दिवस वेळ नाही असे सांगून ताटकळत ठेवले. त्यानंतर समाधान भोई यांचा भाऊ तीन दिवस हेलपाटे मारत होता.तरीही आरोग्य पर्यवेक्षक पदावर असणाऱ्या जावळे यांनी त्यांना कसलीच मदत केली नाही.उलट खोटे नाव सांगून त्याच्याकडून माहिती घे असे सांगितले. त्यानंतर अशी व्यक्तीच पंचायत समितीत नाही हे जावळेना सांगितल्यावर तुम्ही या मी माहिती देतो असे सांगितले.मात्र त्यानंतरही ते माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने समाधान भोई यांनी पंढरपूरचे गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांना याबाबत तक्रार केली असता त्यांनी कोरोनाच्या कामामुळे वेळ मिळाला नसेल त्यांना भेटा ते देतील असे सांगून त्यांचीच बाजू घेत चेंडू पुन्हा जावळेंकडे टोलावला.मात्र त्यानंतरही दाखला नोंदीसाठी जावळे यांच्याकडे कसलाच वेळ नसल्याने तब्बल आठ दिवसांच्या हेलपाट्यानंतर त्यांची भेट झाली.परंतु धक्कादायक म्हणजे त्यांनी भेट झाल्यानंतरही त्यांनी योग्य माहिती न देता जन्मनोंद दाखला मागणीसाठी कोणती कागदपत्रे लागतात हे सांगण्यासाठी आणखी पाच दिवसाचा वेळ
घालवला.तसेच बिडीओंना तक्रार का केली मला बोलता येत नाही का असा उलटप्रश्न केला.त्यानंतर समाधान भोई यांनी प्रतिज्ञापत्र बनवून व रीतसर अर्ज तयार करूनही तो स्वीकारण्याची जावळे यांना वेळच भेटत नसल्याने तब्बल २० दिवस विनाकारण वेळ वाया घालवला.काल समाधान भोई हे सदर कागदपत्रे देण्यासाठी गेले असता त्यांनी इतर कुणाकडेही कागदपत्रे देऊ नका दुपारी भेटा व माझ्याच हातात द्या असे सांगितले.मात्र दुपारी पुन्हा माझ्याकडे कागदपत्रे कशाला देता मला एवढं एकच काम आहे का म्हणत पुन्हा आवक जावकला देऊन जा असे सांगितल्याने सर्वसामान्य नागरिकांना कसा नाहक त्रास दिला जातो याचे उदाहरण समोर आले आहे.
सर्वसामान्य नागरिकांना क्षुल्लक कामासाठी पंढरपूर पंचायत समितीचे अधिकारी कसे जाणुन बुजून त्रास देतात याचाच प्रत्यय या निमित्ताने आला आहे.त्यामुळे अशा निर्ढावलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर सोलापूर जिल्हापरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी अशी ओळख असलेले दिलीप स्वामी कोणती कारवाई करतात की पुन्हा रामभरोसे सोडतात ते पाहावे लागेल.रविकिरण घोडके यांना याबाबत संपर्क केला असता त्यांची भेट होऊ शकली नाही तर जावळेंनी कोणतीच प्रतिक्रिया न देता कॉल कट केला.






