गुन्हा मागे घ्या अन्यथा पोटनिवडणुकीत शरद पवारांच्या सभेत उपोषण करणार।शेतकरी नेते माऊली हळणवर
विठ्ठलचे कामगार व सभासदांनी पाळला काळा दिवस
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : वेणुनगर (गुरसाळे, ता. पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन व संचालक यांनी आठ कामगार आणि तीन सभासद यांच्यावर अपहरण करून खून करण्याची धमकी देणे असा गुन्हा दाखल करून सदर आंदोलकांना तीन महिने नाहक जेलमध्ये डांबले होते व त्यांना जामीन मिळू नये यासाठी देखील प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. त्यामुळे कामगारांच्या व सभासदांच्या कुटुंबाची प्रचंड परवड झालेली होती. आज या घटनेला बरोबर वर्ष होत असून याचा निषेध म्हणून कारखान्याचे अन्यायग्रस्त सभासद व कामगारांनी तहसीलदार कार्यालयासमोर ‘काळा दिवस’ पाळून एक दिवशीय लाक्षणिक उपोषण केले. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासद आणि कामगारांच्या आयुष्यातील आजचा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळला. आज वर्षापूर्वी आठ कामगार व तीन सभासदांना तुरुंगात पाठविले होते. म्हणून आयुष्यातील हा दिवस काळाकुट्ट झाला होता. या घटनेला एक वर्ष पूर्ण होत आहे. म्हणून अन्यायग्रस्त सभासद व कामगारांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला व निवेदनाद्वारे शासनाकडे न्याय मागितला आहे. अन्यायग्रस्त कामगारांना अजूनही पगार मिळाले नाही व सदर कामगारांना कामावर घेतले नाही. अनेक वेळा प्रशासनाकडे व देशाचे नेते शरदचंद्र पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे निवेदन देऊन सुद्धा या कामगारांना अद्याप न्याय मिळाला नाही. म्हणून आज रोजी पंढरपूर तहसीलदार कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करून ‘काळा दिवस’ पाळला व सदर निवेदन तहसीलदार यांच्या वतीने नायब तहसीलदार श्रोत्री यांनी निवेदन स्वीकारले. दिलेल्या निवेदनात कामगारावर झालेला अन्याय संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. यावेळी बोलताना बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर म्हणाले की, ‘शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावर आम्ही आंदोलन करत असतो वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात परंतु विठ्ठल कारखान्याचे व्हाईस चेअरमन यांनी आज वर्षापूर्वी आमच्या वर केलेल्या निंदनीय प्रकारामुळे आम्ही तीन महिने जेलमध्ये होतो. सत्तेचा गैरवापर करून आमच्यावर अन्याय केलेला आहे असून आमच्या कुटुंबियांची उपासमार होत आहे. कारखाना संचालकाच्या गलथान कारभारामुळे सध्या कारखाना डबघाईला आलेला आहे. कामगारांना व सभासदांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही लढतच राहणार आहोत. वेळ प्रसंगी हा लढा तीव्र करणार आहोत. होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पंढरपूर व मंगळवेढा येथे सभा घेणार असतील तर आम्ही सर्व कामगार सभासद कुटुंबियासह पवारांच्या सभेच्या ठिकाणी अमरण उपोषण करणार आहोत तरी पवार साहेबांनी आपल्या कार्यकर्त्यांना सूचना करून आमच्या वरती केलेला खोटा गुन्हा मागे घेण्यासाठी प्रयत्न करावा अन्यथा आमच्या रोषाला सामोरे जावे लागेल यावेळी डॉ. बी. पी. रोंगे म्हणाले की, ‘काही कामगार आणि काही शेतकरी सभासद हे कामगारांना उर्वरित पगार मिळावे म्हणून गेले असता कारखाना प्रशासनाने खोटे गुन्हे दाखल केले होते. त्यावेळी कोरोनाच्या कालावधीत कामगार आणि सभासदांना जवळजवळ पावणे तीन महिने जेलमध्ये बसावे लागले. पुढे जामिनावर कोर्टात केस चालली आणि कोर्टाने ‘कलम लागू होत नाही’ असे सांगून ताशेरे ओढले. तरी देखील कामगार व सभासदांवरील खोटे गुन्हे अजून मागे घेतले नाही व न्याय मिळाला नाही. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे व न्याय मिळावा म्हणून ‘काळा दिवस’ म्हणून पाळले आहे. त्यांच्या भावनांची दखल घ्यावी व न्याय मिळावा यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे.’ यावेळी माजी संचालक शेखर भोसले व अन्यायग्रस्त सभासद व कामगारांनी देखील झालेल्या अन्यायावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या. यावेळी ‘आमच्यावर दाखल केलेले सर्व खोटे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत, आम्हाला पूर्वीप्रमाणे कामावर रुजू करून घ्यावे, आजपर्यंत किती राहिलेले वेतन व देय रक्कम देण्यात यावेत आदी संबंधित कारखाना प्रशासनाने केलेल्या अन्यायाविरोधात घोषणा दिल्या. या मागण्या मान्य न केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र छेडण्यात येईल. असा इशाराही यावेळी कामगार व सभासद यांनी दिला. या निवेदनावर अन्यायग्रस्त कामगार व सभासद माऊली हळणवर, शेखर भोसले, ज्योतीराम कुंभार, रामदास आंध, सागर उर्फ ऋषिकेश वाघमोडे, रामचंद्र अंबुरे, बिभीषण लवटे, शाहीर इनामदार, दत्तात्रय निर्मळ, पोपट शेळके, काशिनाथ लवटे यांच्या सह्या आहेत.
छायाचित्र-






