Surgana

आदिवासी भागातील सर्वच मजूर स्थलांतरित झाल्याने दुचाकीच्या साहाय्याने शिक्षकांने केली भात मळणी.

आदिवासी भागातील सर्वच मजूर स्थलांतरित झाल्याने दुचाकीच्या साहाय्याने शिक्षकांने केली भात मळणी.

सुरगाणा तालुका हा पावसाचे माहेरघर समजला जातो. पावसाळ्यात सरासरी दीड हजार मि.मी पाऊस पडतो. हे पाणी पश्चिम वाहिन्या नद्यां द्वारे लगतच्या अरबी समुद्राला जाऊन मिळते. याच पावसाच्या प्रदेशात उन्हाळ्यात निम्या गावात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. शेती,पिण्याचे पाणी नसल्याने केवळ खरीप हंगामात भात,नागली,वरई या खरीप पिकाची लागवड झाली की आदिवासी भागातील गावे ओस पडू लागली आहेत. द्राक्षे बागावर निफाड, लासलगाव, दिंडोरी, पिंपळगाव त्याच बरोबर सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर मध्यप्रदेश, गुजरात राज्यात कामाच्या शोधार्थ मजूर गेले आहेत. त्यामुळे भात मळणी, खांडणी राब भाजणी करीता मजूरांची टंचाई निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून एका शिक्षकाने नामी शक्कल लढवीत दुचाकीच्या साहाय्याने भात मळणी केली आहे. दुचाकीने मळणी करण्यासाठी अवघ्या तीन ते चार लिटर पेट्रोलच्या साहाय्याने दिवसभरात पंचवीस ते तीस पोते भात मळणी करता येते. भाताच्या पेंढ्या (पुळ्या) बांधून रचलून ठेवलेली उडवीची मळणी सध्या अंतिम टप्प्यात आली आहे. खळ्यावर गोलाकार भाताच्या पेढ्यांतील ओंबी समोरा समोर रचून घेत त्यावर दुचाकी गोलाकार फिरवून दाणे ओंबीला हून तात्काळ वेगळे होतात. उजव्या व डाव्या बाजूने आलटून पालटून पंधरा ते वीस गोलाकार फेरे मारावेत.एकाच बाजूने दुचाकी फिरवू नये. चक्कर,भोवळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.हि विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जे काम वीस ते पंचवीस मजूर करतात तेच काम अवघे चार ते पाच मजूर दिवस भरात करतात. त्यामुळे आर्थिक बरोबरच मजूर टंचाई वर मात करता येते. या सारखेच कृषी विद्यापीठाने संशोधन करीत तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांना परवडणारे साधन उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

फोटो- पिंपळसोंड ता. सुरगाणा येथे भात मळणीसाठी मजूर मिळत नसल्यानेदुचाकीच्या साहाय्याने भात मळणी करण्यासाठी शिक्षक रतन चौधरी यांनी केलेली नामी युक्ती.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button