आय.इ.आय.व स्वेरी यांच्या संयुक्त विद्यमाने इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात कार्यशाळा संपन्न
रफिक आतार
पंढरपूर – इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया) सोलापूर लोकल सेंटर व स्वेरी अभियांत्रिकीचा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा ‘अर्थिंग व डिझाईन’ या विषयावर आयोजित करण्यात आली होती. स्वेरीचे संस्थापक सचिव व इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वेरीत नेहमीच नवनवे उपक्रम सुरू असतात. अशाच उपक्रमांचा एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी एम.एस.इ.टी.सी. एल.,सोलापूर येथील अभियंता अमेय केत यांनी अर्थिंगची संकल्पना व अर्थिंगचे असणारे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले. ऑनलाईन कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी अर्थिंगचे विविध प्रकार तसेच त्याचे विविध प्रकारचे डिझाईन यावर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेच्या शेवटच्या सत्रामध्ये सहभागी सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना या कार्यशाळेचे कौतुक केले. या कार्यशाळेचे समन्वयक म्हणून विभागप्रमुख डॉ. दिप्ती तंबोळी यांनी काम पाहिले. या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यशाळेमध्ये प्राध्यापक, औद्योगिक क्षेत्रातील व्यक्ती तसेच विद्यार्थी अशा एकूण ३६५ जणांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेचे मार्गदर्शक व सर्व सहभागी व्यक्तींचे प्रा. प्रशांत मगदूम यांनी आभार मानले.






