Paranda

भाजपा आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्याकडून टेस्टिंग लॅबसाठी २५ लाखाचा निधी

भाजपा आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्याकडून टेस्टिंग लॅबसाठी २५ लाखाचा निधी

परंडा तालुका प्रतिनिधी सुरेश बागडे दि.२३

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात कोरोना विषाणूची तपासणी करण्यासाठी टेस्टिंग लॅब सुरू करण्यासाठी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आपल्या आमदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधित तीन रुग्ण आढळले होते. यशस्वी उपचारानंतर अंतिम दोन्ही तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या कोरोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी शासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. जिल्ह्यातील अनेकांचे स्वॅब नमुने घेऊन ते अन्य जिल्ह्यांत तपासणीकरिता पाठविले जातात. मात्र त्यांचे अहवाल येण्यास बराच अवधी लागतो. पुढील काळात कोरोना प्रादुर्भावाचा धोका बळावेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायमस्वरूपी कोरोना टेस्टिंग सेंटर उपयुक्त ठरेल.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्रात तज्ज्ञ मनुष्यबळ असून, अशी टेस्टिंग लॅब सुरू करण्याकरिता ६६ लाख ७७ हजार ४७३ रुपये निधीचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी आपल्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून विशेष बाब म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उस्मानाबाद येथील उपकेंद्र येथे कोरोना विषाणू तपासणी केंद्र निर्माण करण्याकरिता, इतर तत्सम वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी २५ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला आहे. अशी माहीती भाजप प्रदेश सरचिटणीस , विधान परिषद मुख्य प्रतोद,आमदारसुजितसिंह ठाकूर यांनी दिली आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button