Maharashtra Election Live: गोळ्या झाडल्या, रक्तबंबाळ झालो तरी बॅलेट पेपर वर मतदान होईल मारकड वाडी ग्रामस्थांचा निर्णय…राज्याच्या इतिहासात मारकडवाडी नोंदल गेले.. शासनाकडून जमावबंदी तगडा बंदोबस्त
राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या असून 5 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईल. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असून भाजपा राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरलाय. मात्र, निवडणुकीच्या निकालानंतर अनेक आरोप केले जात आहेत. सत्ताधाऱ्यांनी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. त्यामध्येच आज मारकडवाडी गावात अभिरूप बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. मारकडवाडी गावात जमावबंदी लागू करण्यात आलीये.
सोलापुरातील माळशिरसमध्ये मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी EVM मशीनच्या मतदानावर आक्षेप घेतला आणि EVM ची सत्यता तपासण्यासाठी थेट मतपत्रिकेवर मतदान घेण्याचा ठराव केला. या घटनेनं राज्यसह देशभरात मारकवाडी चर्चेच्या केंद्रस्थानी आली.
ही मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी तहसीलदारांनी सहकार्य करावे, अशी विनंती मारकडवाडीचे सरपंच व्ही. जी. मारकड यांनी केली होती. मात्र ही मागणी प्रशासनाने फेटाळली आहे. त्यानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला.
त्यानंतर मारकरवाडीमध्ये प्रशासनाकडून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि निर्दोष रितीनेच पूर्ण करण्यात आली आहे, असं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिलं आहे.
माळशिरसचे आमदार उत्तम जानकर ( राष्ट्रवादी काँग्रेस- शरद पवार गट) यांनी हे मतदान थांबवण्याचा निर्णय मागे घेत असल्याचं जाहीर केलं.
प्रशासन सहकार्य करत नसल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचं त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. येत्या काही दिवसांमध्ये आपण हा विषय निवडणूक आयोगासमोर मांडणार आहोत असं त्यांनी सांगितलं.
या निर्णयानंतर मारकडवाडीत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्याशिवाय गावात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले होते.
मारकडवाडीत नेमकं काय घडलं?
आज 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतपत्रिकेनी मतदान घेण्याचे ग्रामस्थांनी निश्चित केले होते. त्यानुसार मतदान केंद्र, मतपत्रिका आदी तयारी ग्रामस्थांनी केली होती.
मात्र गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त, गावातील प्रमुख नागरिकांना नोटीस आणि त्याशिवाय जमावबंदी आदेश लागू केल्याने, गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
EVM बाबत पराभूत उमेदवार अधिक आक्षेप घेत असताना माळशिरस विधानसभा मतदारसंघात विजयी झालेले राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाचे उमेदवार उत्तम जानकर यांनी व त्यांच्या मतदारांनी EVM बाबत आक्षेप घेतला आहे.
आमदार जानकर हे एक लाख मताधिक्याने निवडून येणे अपेक्षित होते, असा त्यांच्या समर्थकांचा दावा होता. मात्र ते फक्त 13 हजार मतांनी विजयी झाले आहेत.






