साडेचार कोटींचा माल लुटणाऱ्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई
प्रतिनिधी – आनंद काळे
बारामती – वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोरगाव-नीरा रस्त्यावर रांजणगाव एमआयडीसीतून सिगारेटचा माल घेऊन निघालेला ट्रक दरोडा टाकून तब्बल साडेचार कोटींचा माल लुटणाऱ्या टोळीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे.उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
24 जून 2020 रोजी दुपारी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रांजणगाव एमआयडीसीतून 4 कोटी 61लाख रुपयाचा सिगारेटचा माल हुबळीकडे निघालेला आयशर ट्रक दरोडा टाकून लुटण्यात आला होता.या घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या पथकासह वडगाव निंबाळकर पोलिसांनी संबंधित आरोपींना जेरबंद करत त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त केला होता.
या प्रकरणी पोलिसांनी कल्याणसिंग सदुलसिंग चौहान, ओमप्रकाश कृष्णा झाला,दिनेश वासुदेव झाला,सुशील राजेंद्र झाला,मनोज केसरसींग गुडेन या आरोपींना अटक करून त्यांच्याकडून 3 कोटी 89 लाख रुपये किमतीची सिगारेट, दोन ट्रक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपीवर महाराष्ट्रसह पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश,कर्नाटक,हरियाणा व ओरिसा येथे दरोडा टाकून माल लुटल्याप्रकरणी गुन्हे दाखल असल्याची बाब समोर आली.त्यामुळे या आरोपीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांच्याकडे पाठवण्यात आला होता.हा प्रस्ताव मंजूर झाला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर करीत आहेत.आत्तापर्यंत बारामती उपविभागात 16 टोळ्याविरोधात आणि 122 आरोपीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.






