तालुक्यातील नागरिकांनी सहकार्य करावे – पोलिस निरिक्षक नारायण सारंगकर
पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर
पुणे: कोरोना या विषाणुजन्य रोगाचे सावट केवळ एकट्या भारतावर नाही तर संपूर्ण जगावर ओढावले आहे. मात्र असे असले तरी आपल्या देशासह महाराष्ट्र राज्याची स्थिती आपल्या हाताबाहेर गेलेली नाही. याकरिता इंदापूर करांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन इंदापूर पोलिस निरिक्षक नारायण सारंगकर यांनी केले आहे .
राज्याचा कोरोना बाधितांचा आकडा आता 101 च्या पुढे गेला आहे. हाच वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात कलम 144 लागू करण्यात आलीय. शिवाय संचार बंदी सह जिल्हाबंदी देखील करण्यात आलीय. मात्र असे असले तरी जनता या सर्व गोष्टींना तितक्याश्या गांभीर्याने घेताना दिसत नाही. सध्या सर्वात जास्त पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये असून इंदापूर हे हाकेच्या अंतरावर आहे. यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वजबाबदारी समजून खबरदारी बाळगावी व शासनाच्या आदेशाचे अगदी तंतोतंत पालन करावे असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलेय.
वारंवार याबाबत सुचना देऊनही इंदापूर शहर व तालुक्यातील विविध गाव व वाड्यावस्त्या वरील तरुन इतरत्र विनाकारण फिरताना दिसत आहेत. अशा नागरिकांनी आपापले घर सांभाळावे. शिवाय ज्यांना या कोरोना विषाणु विषयी माहिती आहे, अशा प्रत्येकाने आपल्या आजुबाजुच्या लोकांमध्ये या बाबत जनजागृती करावी. हे देशहिताचे काम करत असताना आपणाकडून जमाव बंदी कायद्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. ग्रामीण भागातील जनतेला परिस्थितीचे गांभीर्य समजावून सांगावे.अत्यंत किरकोळ साहित्य घेण्यासाठी घरातील दोन ते तिन व्यक्ती समूहाने गाडीवर घराबाहेर पडत आहेत.तर काही अंशी तरुण मुले विनाकारण इकडून तिकडून फेऱ्या मारत असल्याचे चित्र आहे.तर काही ठिकाणी महिला आणि ज्येष्ठ नागरिक घरातून बाहेर येऊन गप्पा मारत उभा राहत आहेत.अनेक लोक चौकाचौकात गर्दी करून गप्पा मारताना दिसत आहेत. हे सर्व व अत्यंत चुकीच्या च्या दिशेला घेऊन जाणारे आहे. आपण अजूनही निष्काळजीपणा केला तर येणाऱ्या दोन आठवड्यानंतर ची परिस्थिती अत्यंत भयावह असेल. इटली या देशाने योग्य ती खबरदारी न घेतलेमूळेच चालू घडीला त्यांचे दिवसाला 800 ते 900 लोक मरण पावत आहेत. याची पार्श्वभूमी आपण ओळखावी.यासाठी सदरिल परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शासनाच्या सचनांचे पालन करा.कोणीही न घाबरता कोणताही त्रास जाणवल्यास आरोग्य विभाग,पोलिस विभागाशी संपर्क साधावा शिवाय आपला वेळ आपल्या घरात कुटूंबासोबत घालवून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन इंदापूर पोलिसांकडून करण्यात आलेय.






