कपर्ला(खुर्द) ग्रामसेवकाचा मनमानी कारभार
सरपंचाला विश्वासात न घेता ग्रामपंचायतीची करतात कामे
सरपंच निर्मला वाघमारे यांचा आरोपचिमुर/प्रतिनिधी –ज्ञानेश्वर जुमनाकेलहान खेडेगावांचा झपाटयाने विकास झाले पाहिजे या हेतूने शासनाने ग्रामपंचायतीची निर्मिती केली आहे. या ग्रामपंचायतीचा कारभार सरपंच व ग्रामसेवक यांच्या मदतीने पहिल्या जातो. परंतु पंचायत समिती चिमुर अंतर्गत येणा-या कपर्ला(खुर्द) येथील ग्रामसेवक संजीव ठाकरे हे सरपंचाला विश्वासात न घेता स्वतःच्या मनमानीने कामे करीत असल्याचा आरोप सरपंच निर्मला वाघमारे यांनी सवर्ग विकास अधिकारी यांचेकडे दिलेल्या निवेदनातून केला आहे.
कपर्ला(खुर्द) ग्रामपंचायतीत अनागोंदी कारभार सुरु असुन गावातील विकास कामे खोळंबली आहे. कपर्ला(खुर्द) ग्रामपंचायतीच्या सरपंच निर्मला वाघमारे ह्या सन २०१५ मध्ये झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी झाले. जिल्हाधिकारी यांनी दिनांक २२ नोव्हेंबर २०१९ ला सरपंच निर्मला वाघमारे यांनी विहित मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याचे कारण देऊन सरपंच पद रिक्त केले होते. त्यानंतर सवर्ग विकास अधिकारी यांनी दिनांक २० डिसेंबर २०१९ ला उपसरपंच सुशील दडमल यांना सरपंच पदाची धुरा सांभाळण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सरपंच निर्मला वाघमारे यांना जिल्हाधिकारी यांनी दिनांक ६ जानेवारी २०२० रोजी पत्र क्र. साशा/कार्या.१२/टे३/ ग्रापंनि/२०२०/३१ नुसार आदेश देऊन पूर्ववत सरपंच पदावर रुजू करून घेतले.
परंतु कपर्ला(खुर्द) ग्रामपंचायतचे ग्रामसेवक संजीव ठाकरे हे प्रशासकीय व वित्तीय कामे सुरळीतपणे चालविण्याकरिता सरपंचाला विश्वासात न घेता स्वतःच्या मनमर्जीने उपसरपंचाला हाताशी धरून अनागोंदी कारभार करीत असल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद आहे.
कपर्ला(खुर्द) चे ग्रामसेवक संजीव ठाकरे यांचेवर कारवाई करावी अशी मागणी सरपंच निर्मला वाघमारे यांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत) यांचेकडे दिलेल्या निवेदनातुन केली आहे.






