खा.डॉ.भारती पवारांच्या विरोधातील अपप्रचार थांबवावा…………!
विजय कानडे
” सुरगाणा तालुक्यातुन खासदार बेपत्ता अशा बातम्या काही वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्या. काही लोकप्रतिनिधी आपले अपयश लपवण्यासाठी आपल्याच काही समर्थकांच्या माध्यमातून अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित करत आहे. खराब रस्त्यांच्या तक्रारी करत खा.भारती पवारांवर खोटे आरोप केले जात आहे. तसे बघितले तर संपूर्ण मतदारसंघात ह्या कोरोना संकटात खा.भारती पवारांनी मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात अनेक वेळा आढावा बैठका घेतल्या. त्याचबरोबर तेथील समस्याही जाणून घेत त्या सोडवण्यासाठी संबंधित विभागाला सूचना केल्या. मग त्यात शेतकरी तसेच गोर गरीब वंचित नागरिकांना मदत मिळवून देण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. शेतकऱ्यांच्या कांद्यावरील निर्यातबंदी उठवणे असो ,मका खरेदी, कापूस खरेदी असो यासाठी केंद्राकडे वारंवार पाठपुरावा केला .ह्या कोरोना संकटकाळात खा. भारती पवार कायम जनतेच्या संपर्कात राहून समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहिल्या व अजूनही आहेत.
कदाचित याचाच पोटशूळ उठून आपल्यावरील अपयश झाकण्यासाठीच काही लोकप्रतिनिधींनी खोट्या बातम्या पेरण्याचे षडयंत्र करत आहेत. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत एकलव्य निवासी इंग्लिश मीडियम शाळा सुरगाणा, कळवण दिंडोरी व पेठ तालुक्यात मंजूर केली असून त्यालाही महाराष्ट्र राज्य आदिवासी विभाग जागा उपलब्ध करून देत नाही, त्याच बरोबर आदिवासी समाजाच्या विकासासाठी केंद्राकडून 275(1) योजना निधी, विशेष केंद्रीय सहायता निधी, सुरगाणा तालुक्यासाठी केंद्राकडून वनबंधु योजना असेल त्यात रस्ते व बंधारे यासाठी निधी मंजूर असतांना देखील त्याला खर्च करण्यास महाराष्ट्र शासनाने स्थगिती दिली आहे. सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर अन्याय होत असताना असे हेतुपुरस्कर आरोप करणारे तथाकथित लोकप्रतिनिधीचें हस्तक का लक्ष देत नाही? आणि राहिला प्रश्न रस्त्यांचा यात खासदारांकडे केंद्र सरकार अंतर्गत येणारे रस्ते येतात परंतु ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, राज्य अंतर्गत येणारे रस्ते हे त्या त्या विभागाचे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन करायचे असतात त्यासाठी फक्त खासदार कसे जबाबदार राहू शकतात? एवढे असूनही खा.डॉ.भारती पवारांनी आपली जबाबदारी न झटकता राज्यांतर्गत व जिल्हा अंतर्गत येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी त्या त्या विभागाकडे नेहमीच पाठपुरावा केला आहे. परंतु खोटे आरोप करणाऱ्या काही नागरिकांनी संबंधित लोकप्रतिनिधिकडे आपल्या समस्या मांडून सोडवून घेतल्या पाहिजे. नेहमीच सर्वच गोष्टींसाठी खासदार व केंद्रासरकारकडे बोट दाखवून कसे चालणार? त्यामुळे आरोप करणाऱ्यांनाही पूर्ण माहिती घेऊनच आरोप आरोप करावे केवळ प्रसिद्धीसाठी व आपले अपयश झाकण्यासाठी असे खोटे आरोप करू नये.






