Mumbai

जव्हार तालुक्यातील आदिवासी, कातकरी कुटुंबांचे स्थलांतर; करोनाकाळात मोठे आर्थिक नुकसान

जव्हार तालुक्यातील आदिवासी, कातकरी कुटुंबांचे स्थलांतर; करोनाकाळात मोठे आर्थिक नुकसान

कासा : पालघर जिल्ह्यतील जव्हार, तालुक्यातील अनेक आदिवासी, कातकरी कुटुंबे उदरनिर्वाहासाठी मूळ गाव सोडून परराज्यात निघाले आहेत. त्यामुळे अनेक गावे ओस पडल्याचे चित्र आहे. साखरशेत, चालवड, वावरवंगणी, देहर्जे आणि तलासरी भागातील आदिवासी, कातकरी दरवर्षी स्थलांतर करतात.
मार्चमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाल्याने अनेक कुटुंबे मूळ गावी परतले होती. आता टाळेबंदीचे काही नियम शिथिल झाल्यानंतर पुन्हा कामाच्या ठिकाणी परतत आहेत. या भागातील शेतीची कामे जवळपास आटोपली आहेत. त्यामुळे रोजंदारीच्या ठिकाणी जाण्यासाठी अनेकांनी सुरुवात केल्याची माहिती एका मजुराने दिली.
जव्हार तालुक्यातील बहुतेक कुटुंबे पावसाळा सुरू होईपर्यंत रोजंदारीवर काम करतात.
गुजरातमधील औद्योगिक पट्टय़ात आदिवासी आणि कातकरी काम करतात. यात कारखाने, शेती आणि वीटभट्टीवर काम करणाऱ्यांची संख्या मोठी असते. यासाठी अनेक जण आदिवासींना आगाऊ पैसे देतात. याशिवाय त्यांच्या राहण्या-खाण्याची, प्रवासाची तसेच काहींची निवासाचीही व्यवस्था केली जात असल्याचे मजुरांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
*अंगणवाडय़ा रिकाम्या*
आदिवासी आणि कातकरी समाजातील मुलांसाठी गाव-पाडय़ांत अंगणवाडय़ा चालवल्या जातात. हे मजूर मूळ गावी परतल्यानंतर त्यांची मुले या अंगणवाडय़ांमध्ये जाऊन धुळाक्षरे गिरवतात. मात्र, पोटापाण्यासाठी पुन्हा स्थलांतरित व्हावे लागल्याने येथील अंगणवाडय़ाही रिकाम्या झाल्या आहेत.
लोक स्थलांतरित होऊ नयेत, यासाठी प्रशासनाने ग्रामपंचायती अंतर्गत त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी कायदे करण्यात आले आहेत. करोनाकाळात तर या कुटुंबांची दयनीय अवस्था झाली होती. यावर सरकारने काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button