?️ जळगांव Live..कोरोना च्या पार्श्वभूमीवर नवीन आदेश जारी..नियम पाळा अन्यथा पुन्हा लॉक डाऊन.. जिल्हाधिकारी अभिजित राऊत
जळगाव जिल्ह्यातील लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर मोठया कार्यक्रमांसाठी आता 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहता येणार नाही असे निर्देश आज जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे.
जिल्हयातील कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन आज जिल्हाधिकारी यांनी कोरोना परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी यापुढील लग्न समारंभ, अंत्यविधी व इतर मोठ्या प्रमाणात गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांना एकावेळी 50 पेक्षा जास्त व्यक्ती उपस्थित राहणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.50 पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास त्याबाबतची जबाबदारी निश्चित करुन नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
परवानगी घ्यावी लागणार
लग्न समारंभासाठी स्थानिक पोलीस स्टेशन व स्थानिक स्वराज्य संस्था यांची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक राहील. तर जास्त गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विविध यंत्रणांची तातडीची बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, उपजिल्हाधिकारी तुकारात हुलवळे, महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रावलाणी, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर तातडीची बैठक
राज्यातील अकोला, नाशिक, अमरावती, नागपूर, जळगावसह काही जिल्हयात कोरोनाचे पुन्हा रुग्ण वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधिक्षक यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. या बैठकीनंतर जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी जिल्ह्यातील प्रमुख यंत्रणांची बैठक घेऊन जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्यक्त करुन तातडीने काही बंधने लावण्याचे निर्देश सर्व संबंधित यंत्रणेला दिले.
मास्क नाही तर प्रवेश नाही
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यापुढे शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, हॉटेल, रेस्टॉरंट, लॉन्स, मंगल कार्यालये, मॉल्स, उद्याने, क्रीडांगणे, सार्वजनिक प्रवाशी वाहतुक करणाऱ्या यंत्रणा या गर्दीच्या याठिकाणी मास्क वापरणे बंधनकारक करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी सर्व संबंधित यंत्रणांना दिले. जे नागरीक मास्क वापरणार नाहीत, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी पोलीस विभागास दिले.
गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन
नागरीकांनी गर्दीचे कार्यक्रम टाळावेत, महापालिका, नगरपालिका, पोलीस विभागाने गर्दीच्या कार्यक्रमांना परवानगी देतांना 100 व्यक्तींची मर्यादा ठरवून द्यावी, अन्यथा अशा कार्यक्रमांना परवानगी देण्यात येवू नये. परवानगी दिलेल्या कार्यक्रमांमध्ये कोरोनाच्या नियमांचे पालन होत असल्याची खात्री संबंधित यंत्रणांनी करावी. विना मास्क तसेच सामाजिक अंतराचे पालन होत नसल्यास संबंधित आस्थापनांवर कारवाई करा असे आदेश देण्यात आले.






