शेतकरी संघटनेचे जिल्हा उपनिबंधकांना घेराव आंदोलन
पोटली,कडता, शॅम्पल बंद नाही झाल्यास संचालक मंडळावर कारवाई करणार – जिल्हा उपनिबंधकांचा इशारा
लातुर प्रतिनिधी:-प्रशांत नेटके
ठोस प्रहार वृत्तसेवा : शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या वतीने लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये पोटली,कडता, शॅम्पल च्या नावाखाली होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवावी व अकार्यक्षम बाजार समित्यांवर ४० इ ची नोटीस काढुन बेकायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प.म.अध्यक्षा सिमाताई नरोडे यांच्या नेतृत्वाखाली दि. ९ मार्च रोजी जिल्हा उपनिबंधकांना घेराव आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन रात्री ८.०० वा.पर्यंत चालले.
लातूर जिल्हा उपनिबंधकांनी जिल्ह्यातील सर्वच कृषी उत्पन्न बाजार समित्यांना पत्र काढून पोटली मध्ये शेतमालाचा खरेदी- विक्री व्यवहार करु नये व कडता, शॅम्पल बंद करणे बाबत ठोस निर्णय घेण्याचे आदेश देऊन, या बेकायदेशीर प्रकारातुन शेतकऱ्यांची लूट बंद नाही केल्यास संचालक मंडळाला जबाबदार धरून त्यांच्यावर महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री (विकास व विनीयमन) अधिनियम १९६३ व नियम १९६७ नुसार कारवाई करण्यात येईल अशा सुचना दिल्या आहेत.
या पत्रानुसार कार्यवाही नाही झाल्यास पणन संचालक,पुणे येथे आंदोलन करण्याचा इशारा महिला आघाडीच्या अध्यक्षा सिमाताई नरोडे यांनी दिला. यावेळी शेतकरी संघटनेचे प्रदेश सदस्य माधव मल्लेशे, जिल्हाध्यक्ष मदन सोमवंशी, युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके,कार्याध्यक्ष बालाजी जाधव, दगडूसाहेब पडीले ,कालीदास भंडे,धोंडीराम पाटील,वसंत कंदगुळे,ज्ञानोबा धुमाळ,हरिश्चंद्र सलगरे,बाबाराव पाटील,अशोक भोसले,अशोक पाटील,शंकर निला,उमेश पवार दिलीप जाधव,सुरज धुमाळ, रमेश देवकर, दत्तात्रय भोयबार,संजय सुर्यवंशी,आदिंसह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.






