Jalgaon

हिंगोणा अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देणार

हिंगोणा अपघातातील मृतांच्या वारसांना

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देणार

पालकमंत्र्यांनी चिंचोल व चांगदेव येथे जाऊन केले मृतांच्या नातेवाईकांचे सात्वंन

सुरेश कोळी

जळगाव, दि. 3 – यावल-फैजपूर रस्त्यावर हिंगोणा गावाजवळ झालेल्या डंपर व क्रुझर गाडीच्या अपघातामध्ये चांगदेव, चिंचोल आणि निंबोल येथील एकूण बारा जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत.

घटनेचे वृत्त कळताच राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज त्यांचे नियोजित कार्यक्रम रद्द करून रात्री ८ वाजता चांगदेव आणि चिंचोल येथे मृतांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांचे सांत्वन केले. याप्रसंगी मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी दोन लाख रूपये मिळवून देण्याची घोषणा केली. पालकमंत्री व आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज दुपारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घटनेची माहिती दिली असून मृतांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत देण्याची मागणी केली असल्याचे सांगितले. तसेच याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आजच विभागीय आयुक्त कार्यालयास पाठविण्यात आला असल्याचे सांगितले.

याप्रसंगी पालकमंत्र्यांसमवेत आमदार चंद्रकांत पाटील, प्रांताधिकारी रामसिंग सुलाने, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश जाधव, तहसीलदार शाम वाडकर, पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, गटविकास अधिकारी सुभाष मावळे, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब व्यवहारे, यांचेसह गोपाळ सोनवणे, अफसर खान, दिलीप पाटील, चांगदेवचे माजी सरपंच पंकज कोळी, अतुल पाटील, संतोष कोळी, हारून शेख आदि उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button