Pune

पुण्यातील अतिरिक्त निर्बंध मागे; किराणाची दुकाने १०ते १२ या वेळेत उघडणार.

पुण्यातील अतिरिक्त निर्बंध मागे; किराणाची दुकाने १०ते १२ या वेळेत उघडणार.

पुणे जिल्हा प्रतिनिधी दत्ता पारेकर

पुणे: करोनाबाधित असलेल्या १० पोलिस ठाण्यांच्या हद्दीत किराणामालाची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय पुढील आदेशापर्यंत मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे करोना प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सकाळी १० ते १२ या वेळेत ही दुकाने सुरू राहतील, असे पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले. समर्थ, खडक, फरासखाना, कोंढवा, स्वारगेट, बंडगार्डन, दत्तवाडी, येरवडा, खडकी व वानवडी पोलिस ठाण्यांच्या भागात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे दोन दिवस अतिरिक्त निर्बंध घालून, दूध सोडून सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती; पण हा निर्णय मागे घेण्यात आला असल्याचे आदेश गुरुवारी रात्री काढण्यात आले आहेत. या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत जीवनाश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहतील, तर इतर क्षेत्रात १० ते दुपारी दोनपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत, असे आदेशात म्हटले आहे.

१२ हजार ९७८ गुन्हे दाखल करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील विविध भागातील जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांना कधी बाहेर पडता येईल, याच्या वेळा निश्चित करून देण्यात आल्या आहेत. जे निर्बंध घालण्यात आलेले आहेत, त्यांची अंमलबजावणी कडकपणे केली जात आहे. आतापर्यंत १२ हजार ९७८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, ३३ हजारांपेक्षा अधिक वाहने जप्त करण्यात आली आहेत. अनेक नागरिकांना नोटिसा देण्यात आल्या असून, त्यांच्याकडून खुलासा मागविण्यात आला आहे. ज्यांची उत्तरे समाधानकारक नसतील, त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. ज्या भागात नियमांचे पालन योग्य पद्धतीने होत नाही, अशा भागात गस्त वाढविण्यात आली आहे. या पुढील काळातही अशीच कारवाई सुरूच राहणार असल्याचे डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button