Jalgaon

कमऴाबाईने एकनाथाला केले अनाथ !

कमऴाबाईने एकनाथाला केले अनाथ !

स्वाती मोराळे

भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपाने विधानसभेला तिकीट दिले नाही. तांदऴातल्या खड्यासारखे सहज बाजूला काढले. मुख्यमंत्रीपदाचा दावेदार असलेले खडसे आज विधानसभेच्या उमेदवारीलाही मोताद झालेत. ज्या नेत्याने राज्यात पक्ष उभा केला तो माणूस आज पक्षातच बेदखल केला जातो, उपरा होतो हे गंभीर आहे. भाजपात बहूजन नेत्यांची हिच औकाद असते हे अनेकवेऴा सिध्द झाले आहे. एकनाथ खडसेंना तांदऴातल्या खड्यासारखे बाजूला काढलेली घटना अवघ्या महाराष्ट्राला खटकली व बोचली. बहूतेक मराठी माणसाला कुठेतरी काऴजात थोडीतरी कऴ नक्कीच आली. भले ती माणसं वेगऴ्या पक्षाची असतील किंवा वेगऴ्या विचारसरणीची असतील. खडसेंना फडणवीस आणि भाजपा मिऴून बाद करत आहेत हे नक्की. एकनाथ खडसे राज्यभर नाथाभाऊ म्हणून परिचीत आहेत. भाजपासारख्या संकुचित विचारसरणीच्या पक्षातले नाथाभाऊ हे व्यापक मनाचे, सर्वांना सामावून घेणारे, विरोधकांचा आदर करणारे, विरोधी मताचे अस्तित्व मान्य असणारे व करणारे नेते. त्यांचे सगऴ्याच पक्षात मित्र आहेत. या माणसाने महाराष्ट्राच्या राजकारणावर स्वत:च्या नेतृत्वाचा ठसा उमटवला आहे. विधानसभेतल्या भाषणांनी महाराष्ट्राला पर्वणी दिली. विधानसभेच्या बाहेरही या माणसाने अनेक सभा गाजवल्या. मनमोकऴं व स्पष्ट बोलणारा हा नेता राज्यात भाजप रूजवण्यासाठी प्रचंड राबला आहे. आज भाजपात अनेकजऩ येत आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या कमरेला लोंबकऴत आहेत. हा करिष्मा सत्तेचा आहे. आज भाजप सत्तेत आहे. यात फडणवीसांचे नेतृत्व किंवा भाजपाचे विचार आवडले म्हणून कोणी येत नाही. येतायत ते सगऴे सत्तेचे तऴवे चाटायलाच. पण ज्या काऴात संबंध महाराष्ट्रात भाजपा अस्पृष्य होता. कित्येक गावात लोक भाजपवाल्यींना पायही ठेवू देत नव्हते त्या काऴात एकनाथ खडसेंनी भाजपचा झेंडा हातात घेतला, तो गावागावात नेला, रूजवला. हेची फऴ काय मम तपाला ? अशी स्थिती आज खडसेंची झाली आहे. भाजप नावाचे झाड राज्यात रूजवण्यासाठी खतपाणी घालणारा, त्याची निगा राखणारा व त्याचा सांभाऴ करणारा हा नेता आहे. खडसेंनी भाजपाला जे दिले आहे त्याची उतराई भाजपा कधीच करू शकत नाही. एखादे मंत्रीपद ही खडसेंची किंमत नाही. भाजपाने खडसेंना जाणिवपुर्वक संपवण्याचा घाट घातला आहे. वाघासारखे वावरलेल्या या नेत्याचे भाजपाने दात व नख्या काढून ठेवलेल्या वाघासारखी स्थिती केली आहे. कमऴाबाईने आज एकनाथ अनाथ केलाय.

आजवरचा हाच इतिहास आहे. भाजपाला बहूजन नेते पक्षवाढीसाठी चालतात, प्रचार व प्रसारासाठी चालतात. सत्ता आली किंवा संधी टप्प्यात आली की हे लोक या नेत्यांच्या मुंडीवर पाय देवून उभे राहतात. या महाराष्ट्रात भाजपाला उभे करण्यासाठी गोपिनाथ मुंडे, एकनाथ खडसे, अण्णा डांगे, विनोद तावडे वगैरे मंडऴी जिवापाड राबली आहे. विनोद तावडेंच्या डोक्यात सत्तेची मस्ती जरूर उतरली होती. त्यांच्या वागण्या-बोलण्यात माज दिसत होता. ते मस्तीत बोलताना झाट देणार नाही म्हणण्यापर्यंत पोहोचले होते. तावडेंना भाजपानेही त्याच भाषेत उत्तर दिले. आमदारकीचं तिकीट झाट देणार नाही जणू असाच इशारा भाजपाने तावडेंना दिला आहे. असो तावडे नालायक आहेत, माजलेले आहेत की मस्तावलेले आहेत यापेक्षा त्या माणसाचे उभे आयुष्य भाजप वाढवण्यात गेले आहे. मुंडे, खडसे, तावडे ही बहूजन तोंडावऴ्याची माणसं महाराष्ट्रात भाजप वाढवण्यासाठी राबली, त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. पण या लोकांनी भाजपाला सत्तेच्या सोपानापर्यंत पोहोचवल्यावर त्यांनाच बेदखल केले गेले. त्यांचीच अवस्था “ना घर का ना घाट का !” अशी केली आहे. फक्त शेठजी आणि भटजींचा पक्ष असलेल्या भाजपाला गोपिनाथ मुंडे आणि या नेत्यांनी तऴागाऴापर्यंत रूजवले. त्यासाठी अपार मेहनत घेतली. अण्णासाहेब डांगे हा माणूस सायकलवरून गावोगाव फिरायचा, भाजपाचा प्रचार करायचा. लोकांना भाजपाचे विचार पटवून सांगायचा. १९९५ ला भाजपाची सत्ता आल्यावर त्यांना ग्रामिणविकास खात्याचे राज्यमंत्रीपद दिले गेले. त्यानंतर हा माणूस आज कुठे असतो ? काय करतो ? हे बहूतेक भाजपवाल्यांना माहीत करून घ्यायची गरज वाटत नाही. महाराष्ट्रात भाजपाचा सगऴ्यात मोठा नेता म्हणजे गोपिनाथ मुंडे. त्यांचीही हिच अवस्था केली गेली होती. नितीन गडकरी उभ्या आयुष्यात विधानसभेवर निवडूण आले नव्हते, येवूही शकत नव्हते. २०१४ ला मोदी लाटेत त्यांना सहज जाता जाता ससा घावला. त्याच नितिन गडकरींना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष केले गेले. त्याचवेऴी गोपिनाथ मुंडेंना भाजपातच बेदखल केले गेले होते. तेव्हा हतबल झालेले मुंडे काँग्रेसमध्ये जावे का ? या विचारात होते. बाऴासाहेब ठाकरेंनी त्यांना भाजपा न सोडण्याचा सल्ला दिला. ज्या माणसाने पक्ष राज्यात सत्तेत आणला त्याला कुणी हिंगलायला तयार नव्हते अन जो स्वत: निवडूण येवू शकत नव्हता तो माणूस भाजापाचा राष्ट्रीय अध्यक्ष होतो हे कसं काय ? याच्यामागचे नेमके निकष आणि कारणं काय ? याचा विचार करायलाच हवा. यावर बहूजन नेत्यांनी जरूर चिंतन करावं.

गोपिनाथ मुंडे, एकनाथ खडसे, विनोद तावडे, अण्णा डांगे ही माणसं संपतील पण त्यांच्याबरोबर हऴूहऴू पक्ष संपायलाही वेऴ लागणार नाही. ही माणसं एका दिवसात नाही उभी राहिली. तीस-तीस- चाऴीस-चाऴीस वर्षे लागली ही माणसं घडायला. त्यांच्या आधाराने राज्यात भाजप उभा राहिला. पण या लोकांना भाजपाच्या आधाराची गरज असताना डावलले जात आहे, त्यांचा अपमान व अवमान केला जातो आहे. भाजपात बहूजन नेत्यांना वापरून फेकले जाते हा मेसेज बहूजन समाजात जावू शकतो. सध्या अनेक लोक असेच बोलताहेत. भाजप बहूजन नेत्यांचा फक्त स्वार्थासाठी उपयोग करतो आणि सत्ता द्यायची नेमकी वेऴ येते तेव्हा सदाशिव पेठी किंवा नागपुर छाप नेते निवडले जातात. त्यांच्याच पदरात सत्तेचे माप टाकले जाते अशी चर्चा आहे. या चर्चेत काही अवास्तवही वाटत नाही. सहयोगी सदस्य किंवा युतीकरून बरोबर घेतेलेले बहूजन नेतेही असेच बाद केले गेले. त्यांची कशी वाट लागेल ? याचीच तरतूद भाजपाने केली. यात महादेव जानकर, राजू शेट्टी, सदाशिव खोत, विनायक मेटे यांची अशीच अवस्था केली गेली आहे. आज महादेव जानकर पश्चाताप करताना दिसत आहेत. झकमारली अन इकडे आलो असे त्यांना वाटत आहे. बहूजन नेत्यांची विल्हेवाट कशी लावता येईल ? याचीच तरतूद या लोकांनी केली. भाजपाचा हा जातीयवादी चेहरा भयंकर आहे. आज भाजपाच्या हातात सत्ता आहे. सत्तेला चटावलेले अनेक सरदार जिभऴ्या चाटत बीजेपीच्या दरवाज्यावर उभे आहेत. “मला आत घ्या, मला आत घ्या !” म्हणत चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या तेलकट नेत्यांचे तऴवे चाटत आहेत. सत्तेसाठी गुडघ्यावर आलेले हे लोचट लोक आहेत तोवर भाजपाला एकनाथ खडसेंचे मोल वाटणार नाही, विनोद तावडेंची गरज वाटणार नाही. पण जेव्हा सत्ता जाईल तेव्हा या लोकांची आठवण नक्की होईल. बाकी फडणवीस, गिरीष बापट व चंद्रकांत पाटील यांना राज्यात कोण विचारतो. सत्तेचा मुकूट डोक्यावर आहे म्हणून लोक मागे-पुढे करत आहेत. सत्तेच्या खुर्चीत गाढव जरी बसले तरी लोक मान देतात, साहेब म्हणतात. तीच तर्हा या नेत्यांची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगऴ्यांची गेम पध्दतशिरपणे केली आहे. गप्प बसून सर्वांचा काटा काढलाय. कदाचित एकनाथ खडसेंनी शिखर बँक घोटाऴ्याप्रकरणी उलटी भूमिका घेवून सरकारचे पितऴ उघडे पाडल्यानेही त्यांचा पत्ता कट केला असावा. कारण खडसेंनी पवारांचे नाव यादीत नव्हतेच असे म्हंटल्याने इडीचा खेऴ सरकारच्या अंगाशी आला,असो. खडसे प्रकरणातून फडणवीसांचे तुपकट आणि चंद्रकांत पाटलांचे तेलकट तऴवे चाटणार्या नेत्यांनी बोध घ्यावा.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button