Pandharpur

लाॅकडाऊन काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांची मागणी

लाॅकडाऊन काळातील घरगुती वीज बिले माफ करावीत मनसे नेते दिलीप धोत्रे यांची मागणी

प्रतिनिधी रफीक आत्तार

पंढरपूर सहा महिन्यांच्या लाॅकडाऊन काळात कमीत कमी वीजेचा वापर झालेला असतानाही वीज वितरण कंपनीने पंढरपूर शहर व तालुक्यातील घरगुती वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा रुपयांची बिले आकारली आहेत. ही वाढीव वीज बिले तातडीने माफ करावीत, अन्यथा वीज वितरण कंपनीच्या विरोधात ग्राहकांचा भव्य मोर्चा काढला जाईल असा इशारा मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी आज येथे दिला आहे.श्री. धोत्रे म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च पासून सर्वत्र लाॅकडाऊन सुरु आहे. या दरम्यानच्या काळात फ्रीज,कुलर, मोठे पंखे, एसी आदी वीजेची उपकरणे ग्राहकांनी बंद ठवली होती. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनीही नागरिकांना फ्रीज, कुलर आदी उपकरणे बंद ठेवण्याचे आवाहन केले होते.मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत ग्राहकांनी अशी उपकरणे बंद ठेवली होती. या काळात वीजेचा वापर देखील कमी झाला होता. तरीही वीज वितरण कंपनीने वीज ग्राहकांना दुप्पट तिप्पट दराने वीज बिलाची आकारणी केली आहे. याच काळात अनेक ग्राहकांना हजारो रुपयांची वीज बिले आकारली आहेत. जादा दराने वीज आकारणी केल्यामुळे अनेक ग्राहकांनी धक्का बसला आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज बिले भरण्यास स्पष्टपणे नकार ही दिला आहे. मागील काही दिवसांपासून वीज वसूलीसाठी ग्राहकांना तगादा लावला जात आहे.

वीज वितरण कंपनीच्या या दंडेलशाही विरोधात आता मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोठे जन आंदोलन उभे केले जाणार आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी मिलिंद शंभकर आणि राज्याचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना येथील वीज वितरण कंपनीच्या या भोंगळ कारभाराची माहिती देवून येथील अधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. येत्या आठ दिवसात लाॅकडाऊन काळातील घरगुती वीज बिल माफ करावीत अन्य़था पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व वीज ग्राहकांना सोबत घेवून येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला जाईल असा सूचक इशाराही श्री. धोत्रे यांनी दिला आहे,यावेळी तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, शहर अध्यक्ष सिद्धेश्वर गरड, महेश पवार, सागर घोडके, प्रताप भोसले, प्रथमेश पवार, हेमंत पवार, कृष्णा मासाळ,अनिल बागल,इत्यादी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button