विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचवण्यासाठी शिक्षकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा – डॉ. अनिल चिताडे
कोरपना – विद्यार्थी हा राष्ट्राचा कणा आहे. विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक ज्ञान पोचविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे प्रतिपादन गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक व गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी केले.
महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय गडचांदूर येथे आयोजित शिक्षक-व्यवस्थापक मंडळ यांच्यातील सहविचार सभेला अध्यक्ष म्हणून उपस्थित असताना ते बोलत होते. कोरोना काळात विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये दुरावा वाढला असून शिक्षण व्यवस्था प्रभावित झाली आहे. पुढे अशी कितीही संकटे आली तरी शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात कायम सातत्य राहावे यासाठी शिक्षकांनी अद्यावत राहून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहून मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे सुद्धा त्यांनी म्हटले. तसेच कोरोना काळात ज्या-ज्या शिक्षकांनी शैक्षणिक साहित्य बनविली ते शैक्षणिक साहित्य गोळा करून शाळेमध्ये ई-लायब्ररी तयार करण्याच्या सूचनाही डॉ. चिताडे यांनी केल्या आहे.
यावेळी मंचावर संस्थेचे उपाध्यक्ष राहुल बोढे, प्रभारी सचिव धनंजय गोरे, ज्येष्ठ संचालक विठ्ठलराव थिपे, संचालक विकास भोजेकर, रामचंद्र सोनपितरे, मुख्याध्यापक कृष्णा बत्तुलवार, उपमुख्याध्यापिका स्मिता चिताडे, उपप्राचार्य विजय आकनुरवार, पर्यवेक्षिका शोभा घोडे आदी मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य कृष्णा बत्तुलवार यांनी केले. संचालन प्रा. आशिष देरकर यांनी केले. तर आभार विना देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.






