अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या — सुदर्शन खांदारे
प्रतिनिधी रफीक आत्तार
पंढरपूर शहरासह तालुक्यामध्ये चालू असलेल्या मुसळधार पाऊस, वारा, अतिवृष्टीमुळे पंढरपूर तालुक्यातील बऱ्याच गावातील नदी, नाले, ओढे शंभर टक्क्यांहून जास्त भरल्यामुळे आलेल्या पुराने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, तर काहींनी आपले सर्वस्व गमावले आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे, त्यांना त्वरित आणि तात्काळ शासनाकडून रोख रकमेची मदत मिळावी म्हणून श्री सुदर्शन रायचंद खंदारे यांनी पंढरपूरचे कर्तव्यदक्ष प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे मागणी केली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, पंढरपूर शहरासह तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत चालू असलेल्या मुसळधार पाऊस, वारा, अतिवृष्टी मुळे पंढरपूर तालुक्यातील बऱ्याच गावातील नदी, नाले, ओढे, तळे 100% हून जास्त भरल्यामुळे याच नदी, नाले, ओढ्यांना मोठ्या प्रमाणात मोठा महापूर आला आहे. या पुरातील पाण्याचा वेग एवढा प्रचंड आहे की या पाण्याने त्याच्या रस्त्यात येणारे छोटे मोठे बंधारे, दोन गावांना जोडणारे पूल वगैरे वाहून नेले. या अतिवृष्टीच्या पाण्याने कोणत्याही गोष्टीची गय केली नाही.या पुराच्या पाण्याने नदी, नाले, ओढ्याच्या आसपासच्या गावातील, वस्तीवरील लोकांचे शेतीचे, घराचे, शेतीतील पिकांचे, पशुधनाचे प्रचंड प्रमाणात मोठे नुकसान झाले आहे. अचानक रात्रीच्यावेळी पावसाचे पाणी नदी, नाले, ओढ्याच्या महापुराच्या स्वरूपात घरात घुसू लागल्याने वाड्या वस्त्यांवरील लोक जैसे थे अशा पद्धतीने घरातील पसारा टाकून आपले सर्वस्व सोडून स्वतःचा आणि आपल्या लेकरा बाळांचा जीव वाचविण्यासठी जिकडे, ज्या दिशेने सुखरूप वाट मिळेल तिकडे पळत सुटले आणि आपला आणि आपल्या लेकरा बाळांचा जीव वाचवला. यात काही ठिकाणी पंढरपूरचे कर्तव्यदक्ष प्रांत अधिकारी सचिन ढोले यांनीही आपल्या परीने लोकांचे जीव वाचवले. या सर्व धावपळीमध्ये लोकांना स्वतःला जीव वाचविणे महत्त्वाचे असल्यामुळे घरातील सर्व सामान जैसे थे असल्याने घरात घुसलेल्या पाण्याने अन्नधान्याचे, कपड्यालत्यांचे ही नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. या अचानक आलेल्या पुरामध्ये शेतकऱ्यांनी आपले सर्वस्व गमावले आहे. यामुळे बाधित कुटुंबे उघड्यावर आले आहे. शासकीय नियमानुसार पंचनामे होऊन नुकसान भरपाई मिळण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. त्यामुळे पंचनामा होतेवेळी अथवा त्यापूर्वी बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आणि रोख स्वरूपाची मदत मिळणे आवश्यक आहे. अशी मागणी श्री सुदर्शन रायचंद खंदारे यांनी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे केली आहे.






