हॅलो सरपंच मी प्रांताधिकारी बोलतोय….. प्रांतांधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे तालुक्यातील शेकडो लोकांचे वाचले प्राण कोरोनाकाळात लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सचिन ढोले २४ तास ऑन ड्युटी
रफिक आतार पंढरपूर
पंढरपूर : रात्री ११.४५ ची वेळ देगावचे सरपंच संजय घाडगे यांचा मोबाईल खणाणतो,सरपंच कॉल उचलतात,”नमस्कार सरपंच,मी प्रांताधिकारी बोलतोय.तुमच्या पेशंटला बेड मिळाला आहे.काळजी करू नका प्रशासनाकडून जे होईल ते पूर्ण सहकार्य केले जाईल.”असा प्रत्यय पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावातील एकातरी व्यक्तीला आलाच आहे.कारण कोरोना काळात कुणाला बेड मिळत नसेल,कुणाची ऑक्सिजनची अडचण असेल अगर कुणाला रेमडीसीवीर ची आवश्यकता असेल त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आपुलकीने सर्वतोपरी प्रयत्न करणारा एकमेव अधिकारी म्हणजे पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले.त्यांच्याशी बोलण्यासाठी ना ओळख लागते ना वशिला.अडचणीच्या काळात कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीच्या कॉलला तितक्याच आपुलकीने रात्री अपरात्री कधीही मदतीसाठी तयार असणारा हा अधिकारी.रात्री कितीही वाजता कॉल केला तर आपुलकीने विचारपूस व मदत करणारा हा अवलिया सध्या पंढरपूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या मनात घर करून गेला आहे.गेल्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा ही दुसरी लाट भयानक व अत्यंत जीवघेणी ठरली.पंढरपूर तालुकाही याला अपवाद राहिला नाही.पंढरपूर तालुक्यात आजवर २० हजारांहून अधिक बाधीत आढळले असून कोरोनामुळे ४२४ लोकांचा मृत्यू झाला आहे.गेल्या पंधरा दिवसांखाली ही लाट अंत्यत उंचीवर होती.या काळात रुग्णवाढीच्या उच्च दरामुळे ना बेड मिळत होते ना नीटसे उपचार.अशा काळात सर्वसामान्य लोक भेदरलेले असताना त्यांच्यासाठी प्रांताधिकारी सचिन ढोले यांची मदत व आपुलकी रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाईकांसाठी संजीवनी ठरली आहे.प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या सहकार्यामुळे आजवर शेकडो लोकांचे प्राण वाचल्याने असा अधिकारी पंढरपूर तालुक्याला लाभला हे आमचे भाग्य असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.२४ तास कधीही कॉल केला तर प्रांताधिकारी कॉल उचलून मदत करतातच असा अनुभव जवळपास सर्वच लोकांनी बोलून दाखवला आहे.त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील कोरोनाचा उद्रेक बऱ्याचअंशी कमी होण्यास त्याचे मोलाचे योगदान आहे.
“माझ्या गावातील अनेक रुग्णांसाठी मी साहेबांना कॉल केला होता.त्या प्रत्येकवेळी त्यांचे सहकार्य व मदत मिळाली.आमच्या ग्रामपंचायतीचे एक विद्यमान सदस्य गेल्या पंधरा दिवसांपूर्वी बाधित झाले होते.त्यांची परिस्थिती नाजूक होती व आर्थिक स्थितीही खर्च करण्याची नव्हती.यावेळी प्रांत साहेबांना कॉल केला व माहिती दिली.त्यांनी चार तास सलग प्रयत्न करून उपजिल्हा रुग्णालयात रात्री ११ वाजता बेड मिळवून दिला व सतत चार दिवस स्वतःहून तब्बेतीची विचारपूस केली.आमच्या गावातील तब्बल ६ जणांचे प्राण साहेबांनी वाचवले आहेत.कोरोना काळ संपल्यानंतर आम्ही सर्व गावकऱ्यांच्या हस्ते साहेबांचा भव्य सत्कार करणार आहोत. धन्यवाद साहेब.” संजय घाडगे देगाव ग्रामपंचायत ता.पंढरपूर






