Jalgaon

Jalgaon Live: शहरात हरवलाय चक्क नाला..!पाहू या मिळतोय का..?

Jalgaon Live: शहरात हरवलाय चक्क नाला..!पाहू या मिळतोय का..?

जळगाव शहरात चोर्‍या-मार्‍या होणे किंवा एखादी वस्तू हरविणे, हे काही नवे नाही. मात्र जर तुम्हाला कुणी सांगितले की, शहरातील सांडपाण्याचा एक नाला हरवला आहे, तर तुम्ही विश्‍वास ठेवाल का? मकरंद अनासपुरे यांचा २००७ मध्ये ‘जाऊ तिथे खाऊ’ हा धमाल विनोदी चित्रपट आला होतो. तसाच काहीचा प्रकार जळगावमध्ये समोर आला आहे. फरक एवढा आहे की चित्रपटात विहीर हरवली होती व जळगावला सांडपाण्याचा नाला हरवला आहे. या प्रकरणी रहिवाशांच्या तक्रारीनंतर महापालिकेने १० जणांना नोटीसा बजावल्या आहेत.

रामानंद परिसरातील उतारावरून वाहणारा नाला प्रिंप्राळा व आशाबाबानगर परिसरतून वाहतो. मात्र, या भागात ज्यांनी नालाकाठी जागा घेतल्या, त्यांनी आपल्या प्लॉटचे बांधकाम झाल्यानंतर त्यात भराव टाकून स्वत:ची जागा वाढवून घेतली. हा प्रकार गेल्या २० ते २५ वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे हा नाला पुढे जाऊन काही ठिकाणी चक्क ‘नाली’ झाला आहे. या प्रकाराची तक्रार रहिवाशांनीच केल्याने महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांनी याची पाहणी केली. नकाशामध्ये नाला आहे मात्र प्रत्यक्षात नालाच नसल्याचे दिसून येत असल्याने अधिकारीही चक्रावले आहेत.
नागरिकांच्या तक्रारी आल्यावरून महापालिकेच्या नगररचना विभागाने आता नालाकाठावरील दहा जणांना नोटीस बजावल्या आहेत. महापालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले, की नाला सरळीकरणासाठी प्रयत्न करण्यात येतील. आता हा नाला ज्या ठिकाणाहून वाहत आहे, त्या ठिकणावरून तो जवळच्या नालाला जोडण्याचा प्रयत्न केला जाईल. ज्यांनी नाल्याकाठी बांधकाम केले आहे, त्यांना येत्या १५ दिवसांत आपल्या कागदपत्रासह नगररचना विभागात हजर राहण्याच्या नोटीस बजावल्या आहेत. कागदपत्रांच्या तपासणीनंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button