खेळाप्रमाणे समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकत्र यावे – आमदार मंगेश चव्हाण
जळगाव येथे मराठा प्रिमिअर लीगचे आयोजन
मराठा समाजातील दानशूरांनी स्वीकारल्या २४ संघांच्या जबाबदाऱ्या
मनोज भोसले
जळगाव – संपूर्ण समाजाच्या स्वास्थ्यासाठी आपल्याला आपल्या जीवनशैलीचा पुनर्विचार करावा लागणार आहे. मराठा प्रिमिअर लीगच्या माध्यमातून समाजातील तरुणांना खेळाचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे, खेळात ज्याप्रमाणे आपल्या संघाला विजयी करण्यासाठी सर्व एकत्र येतात त्याचप्रमाणे समाजाच्या हितासाठी सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून खेळाडूवृत्तीने एकत्र यावे असे आवाहन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. ते जळगाव येथे मराठा प्रिमिअर लीगच्या अंतिम सामन्याच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते.

यावेळी विधानपरिषदेच्या आमदार स्मिताताई वाघ, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, प्रतिइतिहासकार चंद्रशेखर शिखरे, रविंद्र भैय्या पाटील, मराठा सेवा संघाचे राम पवार, सुरेश पाटील, सुरेंद्र पाटील, डॉ.राजेश पाटील, विनोद भोईटे, हिरेश कदम आदी उपस्थित होते.
मराठा प्रीमिअर लीगमध्ये एकूण २४ संघ सहभागी झाले होते, यातील प्रत्येक संघाला महाराष्ट्राच्या संत परंपरेतील महान संतांचे नाव देण्यात आले होते तसेच मराठा समाजातील दानशूर व्यक्ती आणि उद्योजकांनी या २४ संघांची जबाबदारी स्वीकारली होती. यावेळी अंतिम सामना संत ज्ञानदेव व संत रविदास या संघांमध्ये झाला यात संत ज्ञानदेव संघाने विजय मिळवत मराठा प्रिमिअर लीगचा कप जिंकला.
पुढे आमदार चव्हाण म्हणाले की, क्रीडा क्षेत्र केवळ स्पर्धात्मक खेळातल्या प्रगतीसाठी नाही; तर एक संपूर्ण आरोग्यपूर्ण जीवनशैली विकसित करण्यासाठी महत्वाचे आहे, सध्याच्या धकाधकीच्या युगात आपले राहणीमान निष्क्रिय झाले आहे. त्यामुळे खेळांसाठी लागणारे शरीर स्वास्थ्य आपल्याला केवळ तो खेळ खेळून मिळणार असल्याचे प्रतिपादन केले.
सर्वाना सोबत घेत मराठा प्रीमिअर लीगचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह सर्वच मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.






