Nandurbar

मद्यपी वाहन चालकांवर कारवाईसह लायसन्स निलंबनाची नंदुरबार पोलीसांची मोहीम सुरुच

मद्यपी वाहन चालकांवर कारवाईसह लायसन्स निलंबनाची नंदुरबार पोलीसांची मोहीम सुरुच

नंदुरबार फहीम शेख

मा. पोलीस उप महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांनी संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करणेबाबत तसेच रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्यमध्ये झालेली वाढ लक्षात घेता मा.पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहन चालकांविरुध्द् वेळोवेळी विशेष मोहिमांचे आयोजन करण्यात आले होते. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत चारचाकी व दुचाकी मोटार सायकल चालकांची तपासणी केली असता काही वाहन चालकांनी मद्यपान केलेले आढळुन आले, त्यामुळे त्यांचे विरुध्द् वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामध्ये प्रामुख्याने नंदुरबार शहर- 21, उपनगर 05, नंदुरबार तालुका 10, विसरवाडी 28, नवापुर 24, शहादा 10, सारंगखेडा – 06, म्हसावद – 06, धडगाव- 10, अक्कलकुवा – 09, तळोदा 08 मोलगी – 07, शहर वाहतुक शाखा 26 असे एकुण 170 गुन्हे मद्यपी चालकांवर नोंदविण्यात आले. त्यातील 08 वाहन चालकांचे लायसन्स यापुर्वी 03 महिने व 06 महिनेसाठी निलंबीत करण्यात आले होते.
दिनांक 30/12/2021 रोजी यातील उर्वरीत 30 वाहन चालकांचे लायसन्स निलंबन प्रस्ताव तसेच रस्ते अपघातातील पादचारी, दुचाकी वाहन चालक व इतर अपघातांच्या 134 गुन्ह्यातील अपघात करुन पळुन गेलेल्या वाहन चालकांचा शोध घेवुन 26 वाहन चालकांचे लायसन्स निलंबन प्रस्ताव असे एकुण 56 वाहन चालकांचे लायसन्स निलंबीत करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशीक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठविण्यात आले आहेत. तसेच भविष्यात ही मोहीम आणखी तीव्र करण्यात येणार आहे.आगामी नववर्षाचे पूर्वसंध्येस देखील दारु पिऊन वाहन चालवितांना कोणी दुचाकीस्वार व चार चाकी स्वार आढळुन आल्यास त्यांचेवर अधिक कठोर कारवाई करुन लायसन्स निलंबित करणेची कारवाई करण्यात येईल असे मा. पोलीस अधीक्षक श्री. पी. आर. पाटील यांनी सांगितले.नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, दारु पिऊन कोणीही वाहन चालवू नये, दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितास देखील धोकेदायक आहे. नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियम पालन करावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button