महावितरणच्या गलथानपणामुळे गंगापूर येथे अल्पभूधारकाची म्हैस मेली.
म्हैस पडलेली पाहून लाईक शेख पळाले दूर म्हणून वाचला जीव.
लातुर लक्ष्मण कांबळे
तालुक्यातील गंगापूर येथे काल दिनांक २७ जून २०२० शनिवार रोजी दुपारी चारच्या दरम्यान लाईक अब्बास शेख हे आपल्या शेतातून म्हैस चारून गावाकडे घेऊन येत असताना बांधावरच्या इलेक्ट्रिक सिमेंटच्या पोलला तो पोल पडू नये म्हणून जो स्टे दिलेला असतो त्या स्टे मध्ये करंट उतरल्यामुळे लाईक अब्बास शेख या अल्पभूधारक शेतकऱ्याची म्हैस करंट लागून जागेवरच मृत्यू पावली. म्हैस अचानक खाली पडत असलेली पाहून लाइक अब्बास शेख हे दूर पळाल्यामुळे त्यांचा जीव वाचला. अन्यथा लाइक शेख यानाही आपला प्राण गमवावा लागला असता. आणि लाईक शेखचा गरीब परिवार निराधार झाला असता.
दहा महिन्यापूर्वीच औसा तालुक्यातील लामजना येथून लाईक शेख यांनी ती म्हैस पन्नास हजार रुपयाला विकत आणली होती. गेल्या दहा महिन्यापासून लाईक शेख यांचा परिवार या म्हशीचा सांभाळ करत होता. दररोज सकाळ संध्याकाळ चार चार लिटर दूध देणारी म्हैस कुटुंबाचा मोठा आधार बनली होती. लाईक शेख आणि त्यांची पत्नी यांनी ही म्हैस खूप जिवापाड चांगली सांभाळली असल्यामुळे आज या म्हशीला जवळपास ६५ ते ७० हजार रुपयेची मागणी झालेली होती.
अचानकपणे महावितरणच्या या गलथानपणामुळे म्हशीचा मृत्यू झाल्याने या अल्पभूधारक शेतकऱ्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. या म्हशीच्या मृत्यूस कारणीभूत महावितरणाचा भोंगळ कारभारच आहे. महावितरणने या अल्पभूधारक आणि अल्पसंख्यांक शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत करावी अशी मागणी भाजपाचे व्यंकटराव पनाळे यांनी कार्यकारी अभियंता महावितरण लातूर यांच्याकडे केली आहे.
शेतामधील अनेक ठिकाणी विजेच्या तारा माणसाच्या हाताला येतील अशा अवस्थेत आहेत. अनेक ठिकाणचे डीपी सताड उघडे आहेत. ज्या ठिकाणी पोलला स्टे दिलेले आहेत त्याच्यासाठी कुठलेही सुरक्षा आवरण नाही. तेव्हा अशा सर्व कामाची तात्काळ देखभाल व दुरुस्ती करण्यात यावी अशीही मागणी व्यंकटराव पनाळे यांनी कार्यकारी अभियंता महावितरण लातूर यांच्याकडे केली आहे.






