पुणे सोलापूर महामार्गावर भिगवण जवळ अपघात अपघातात लातूरच्या माने परिवारातील तिघांचा मृत्यू
प्रशांत नेटके लातूर
लातूर : येथील सरस्वती कॉलनीतील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर दिलीप माने यांचे चुलत बंधु लातूरातील माने टायर्सचे मालक अरुण बाबुराव माने, त्यांच्या पत्नी गीता माने, मुलगा मुकूंदराज माने या तिघांचा दि. ७ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर भिगवण येथे अपघाती मृत्यू झाला.
माने कुटूंबिय एम. एच. २४ एटी २००४ या क्रमांकाच्या कारने प्रवास करीत होते. रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास भिगवण येथे माने यांची कार एम. एच. ४५ एफ ७७७८ या क्रमांकाच्या ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला पाठीमागुन जोरात धडकली. या अपघातात अरुण माने यांच्या पत्नी गीता माने व मुलगा मुकुंदराज माने यांचे जागीच निधन झाले. अरुण माने यांना उपचारासाठी रुग्णवाहिकेने पुण्याला घेऊन जात असताना वाटेत त्यांचे निधन झाले. त्यांची मुलगी साक्षी अरुण माने ही गंभीररित्या जखमी असून तिच्यावर पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातात कारचालक महादेव रखमाजी नेटके हे देखील गंभीर जखमी झाले आहेत.
अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चेंदामेंदा झाला. कारमधील जखमींना क्रेनच्या सह्याने बाहरे काढावे लागले. मयत तिन्ही मृतदेहाची पुणे येथे उत्तरीय तपासणी करुन दि. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास येथील सरस्वती कॉलनीतील माने यांच्या निवासस्थानी आणण्यात आले. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास येथील खाडगाव स्मशानभूमीत तिघांवरही अंत्यसंस्कार करण्यात आले. अरुण माने यांच्या पश्चात चुलत भाऊ दिलीप माने, सख्खे भाऊ महेंद्र माने, सचिन माने, भावजय, पुतणे, असा मोठा परिवार आहे.






