तहसीलदार वैशाली वाघमारे यांच्या बदलीनंतर पंढरपूरात पेढे वाटून आनंदउत्सव !
पंढरपूर : एखाद्या चांगल्या आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्याची प्रशासकीय बदली झाल्यानंतर त्या – त्या भागातील अनेक लोक रस्त्यावर उतरून बदली रद्द करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करतात. पंढरपुरात मात्र एका महिला तहसीदाराच्या बदलीनंतर वेगळाच प्रकार अनुभवायला मिळाला आहे. बदली झाल्याची माहिती कळताच बळिराजा शेतकरी संघटनेसह शहर व तालुक्यातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिर परिसरात जाऊन पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. एका वर्षाच्या आतच तहसीलदार वैशाली वाघमारे यांची बदली झाली आहे.
तहसीलदार वैशाली वाघमारे पंढरपुरात रुजू झाल्यापासून त्यांच्याविषयी नाराजी होती.
लोकांशी संपर्क न ठेवणे, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, राजकीय पदाधिकारी यांचे फोन न घेणे यासह विविध कारणांमुळे त्यांच्याविषयी नाराजी होती. त्यांच्या कामाविषयी वरिष्ठांकडे लेखी आणि तोंडी तक्रारी करण्यात आल्या होत्या. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, स्वाभिमान शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील यांनीही त्यांच्या बदलीची मागणी केली होती.
कोरोना काळात पत्रकारांशी त्यांचा वाद झाला होता. त्यांची तक्रार महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत गेली होती. अलीकडेच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा होत असल्याच्या विषयी तक्रारी वाढल्या होत्या. एकूण त्यांच्या एका वर्षातील कामगिरी ही पंढरपूरकरांच्या दृष्टीने सुमार दर्जाची झाल्याने त्यांच्याविषयी नाराजी होती. त्यामुळेच आज सोशल मीडियामधूनही अनेक नेटकऱ्यांनी त्यांच्या बदलीचे समर्थन केले. तर विविध सामाजिक संघटना व कार्यकर्त्यांनी बदलीचा आनंदोत्सव म्हणून पेढे वाटले.
आतापर्यंत पंढरपुरात तहसीलदार म्हणून काम केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये तहसीलदार वैशाली वाघमारे यांचे काम निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया बळिराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली हळणवर यांनी दिली.






