आ. अभिमन्यू पवार यांचे सरकारला निवेदन
औसा लक्ष्मण कांबळे
महाराष्ट्र सरकारकडून कोरोना विषाणूच्या प्रादुभावापासून राज्याला वाचवण्यासाठी आखावयाच्या उपाययोजनांबाबत जाणीवपूर्वक होत असलेल्या दुर्लक्षाकडे आज औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी तहसीलदार यांना निवेदन देऊन सरकारचे लक्ष वेधले तसेच जनतेच्या जिव्हाळ्याच्या मागण्याही मांडल्या.
लोकडाऊनच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी व लोकडाऊननंतरची परिस्थिती हाताळण्यासाठी ४२ हजार होमगार्र्ड्सना वर्षभर कर्तव्य द्यावे, बाराबलुतेदारांना व हातावर पोट असणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना आर्थिक मदत करावी, परजिल्ह्यात अडकून पडलेल्या नागरिकांसाठी स्वगृही परतण्यासाठी बसेसची व्यवस्था करावी, शेतकऱ्यांना खरीप पेरणीसाठी हेक्टरी १० हजार रुपये बिनव्याजी कर्ज द्यावे, शेतमजुरांना मनरेगा अंतर्गत मजुरी अदा करावी, लातुर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रलंबित असलेले अनुदान तात्काळ वितरित करावे आदी मागण्या आ. पवार यांनी सरकारकडे केल्या आहेत.
दुर्दैवाने आणि राज्य सरकारच्या गलथान कारभारामुळे देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या, कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू आणि सर्वाधिक मृत्यूदर महाराष्ट्र राज्यात आहेत. लोकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून लोकडाऊनचा फज्जा उडालेला आहे, ना प्रशासनात समन्वय आहे ना निगडित मंत्रालयांमध्ये. लाखो विद्यार्थी परजिल्ह्यात/ परराज्यात अडकून पडले आहेत. मा परिवहनमंत्र्यांनी स्वतः घोषणा केली की परजिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांसाठी मोफत बससेवा सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दुसऱ्या दिवशी दुसऱ्या कोणी तरी तो निर्णय फिरवला. आज निवेदनाच्या माध्यमातून राज्यातील शासकीय व प्रशासकीय गोंधळाकडे सरकारचे लक्ष वेधले.
देशातील सगळ्यात प्रगत आणि सशक्त राज्य असलेल्या महाराष्ट्र राज्यातील महाविकासाआघाडी सरकारने अद्यापपर्यंत राज्यातील जनतेला १ रुपयाचीही आर्थिक मदत केलेली नाही याचे मोठे आश्चर्य वाटत आहे. आणि म्हणूनच की काय माजी मुख्यमंत्री मा श्री पृथ्वीराजजी चव्हाण यांच्यासह महाविकासाआघाडीतील अनेक नेते सरकारच्या अपयशावर आणि भोंगळ कारभारावर उघड चर्चा करू लागले आहेत. असे ही आ. अभिमन्यू पवार यांनी निवेदनात नमूद केले आहे.






